बातम्या
खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेनेचे यशस्वी निवेदन – आंदोलनाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यास सुरुवात
By nisha patil - 10/14/2025 5:40:52 PM
Share This News:
खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेनेचे यशस्वी निवेदन – आंदोलनाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यास सुरुवात
कोल्हापूर (दि. १४ ऑक्टोबर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गणेश चतुर्थीपूर्वी टेंबलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमान या दरम्यानच्या खड्डेमय रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्या वेळी विभागाने तात्पुरते खड्डे बुजवले होते; मात्र काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पुन्हा बिकट झाली. परिणामी या मार्गावर तब्बल ३० ते ४० लहान-मोठे अपघात झाले असून, हायवेखालील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात शिवसेनेने वारंवार सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधले; परंतु ठोस कारवाई न झाल्याने अखेर १४ ऑक्टोबर रोजी आंदोलनाची घोषणा करण्यात आली. आंदोलनाची पूर्वसूचना विभागाला १० ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती. मात्र, आंदोलनाचा झटका बसल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने खड्डे भरण्याचे काम सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सुरू केले.
शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले (बापू) यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाचे उद्दिष्ट नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते दुरुस्त होण्याची मागणी होती. विभागाने खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याबद्दल शिवसेनेने स्वागत केले आणि उपअभियंता श्रीकांत सुतार यांना निवेदन देऊन भविष्यात आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी विनंती केली.
या वेळी प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष चौगुले, तालुका सचिव सचिन नागटिळक, तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपतालुका प्रमुख अक्षय परीट, ग्राहक सेनेचे संजय काळुगडे, गाव प्रमुख दीपक रेडेकर, तसेच फेरीवाला संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब नलवडे, माजी डेप्युटी सरपंच विराग करी यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिकांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, “रस्त्यांची दुरुस्ती फक्त आंदोलनानंतरच होत असल्याची लोकांत चर्चा आहे. पुढे असे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे.”
खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेनेचे यशस्वी निवेदन – आंदोलनाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यास सुरुवात
|