बातम्या
शिवरायांच्या विचारांनी उजळला उत्सव - शिव कॉलनीतील महिलांचा प्रथमच प्रेरणादायी शिवजयंती सोहळा !
By nisha patil - 4/20/2026 1:33:19 PM
Share This News:
**शिवरायांच्या विचारांनी उजळला उत्सव - शिव कॉलनीतील महिलांचा प्रथमच प्रेरणादायी शिवजयंती सोहळा !*
**आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा येथील शिवकॉलनीत एक अनोखी शिवजयंती अनुभवायला मिळाली. कॉलनीतील माता भगिनी एकत्र येत यावर्षी पहिल्यांदाच रयतेचे राजे, महिलांचा आदर करणारे राजे,
स्त्रियांना “मातेसमान" मानून त्यांचा सन्मान करणारे, त्यांच्या राज्यात स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे, अगदी शत्रूच्या स्त्रियांनाही मानमर्यादा देणारे, जिजाऊंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व महिला एकत्र येत शिव जयंती साजरी करण्याचा हा पहिलाच योग म्हटलं तर वावगे ठरणार नाही. शिव कॉलनीच्या महिलांनी यावर्षी पहिल्यांदाच एकत्र येत अनोखा आणि आदर्शवत शिव सोहळा साजरा केला.
ज्यांच्या पवित्र चरणस्पर्शाने ही धरणी धन्य झाली, जे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान आहेत, अशा या रयतेच्या राजाची जयंती शिव कॉलनीतील महिलांनी अत्यंत उत्साहात आणि मोठ्या संख्येने एकत्र येऊन साजरी केली.
या सोहळ्यात केवळ उत्सव नव्हता, तर शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचा एक संकल्प होता.स्त्रियांच्या सन्मानासाठी उभं राहण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि समाजात एकतेची ज्योत पेटवण्याचा. सर्वांनी एकमेकांचे तोंड गोड करून एकमेकांना आनंद वाटला, पण त्याहूनही गोड होती ती शिवरायांच्या विचारांची आठवण जी आजही आपल्याला धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचा मार्ग दाखवते.
यावेळी पल्लवी कुंभार, विमल कुंभार, विद्या कुंभार, भावना सावंत, अश्विनी सावंत, ज्योती शिंदे, सुनीता चव्हाण, आशिया मकानदार, झरीना शेख, उर्मिला कोकितकर, सरोजिनी सावंत, कमल कांबळे, शोभा राजदीप, सुप्रिया कुलकर्णी, ज्योती पवार, संगीता कुंभार, सारिका शिंदे, अमृता बाबर, मंगल सुतार आदी माता भगिनींनी सहभाग नोंदवला.
शिवरायांच्या विचारांनी उजळला उत्सव - शिव कॉलनीतील महिलांचा प्रथमच प्रेरणादायी शिवजयंती सोहळा !
|