शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठ आंतर-विभागीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा : ऋषिकेश, आदित्य, शर्वरी आणि सृष्टी आघाडीवर
By nisha patil - 10/13/2025 6:20:49 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ आंतर-विभागीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा : ऋषिकेश, आदित्य, शर्वरी आणि सृष्टी आघाडीवर
कोल्हापूर, दि. १३ : सायबर ट्रस्ट संचलित नॉन-कन्वेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर-विभागीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन विभागांतील महिला व पुरुष गटातील एकूण ३६ बुद्धिबळपटू सहभागी झाले असून, त्यापैकी १५ खेळाडू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य सिद्धार्थ शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किरण पाटील, स्मिता कुंभार, राहुल लहाने, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सुरेश धुरे, रामेश्वरी गुंजीकर, विजय रोकडे, गौतम घुणके, डॉ. विद्या पाटील, मनीष मारुळकर, उत्कर्ष लोमटे आणि आरती मोदी उपस्थित होते.
स्पर्धा पुरुष आणि महिला गटात स्वतंत्रपणे स्विस लीग पद्धतीने पाच फेऱ्यांत होत असून, तिसऱ्या फेरीनंतर पुरुष गटात कोल्हापूरचे ऋषिकेश कबनूरकर आणि आदित्य सावळकर प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. तर महिला गटात कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर आणि सृष्टी कुलकर्णी प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
सिद्धार्थ शिंदे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की, “बुद्धिबळामुळे एकाग्रता, संयम आणि गणिती कौशल्य विकसित होऊन जीवनातील निर्णयक्षमतेत वाढ होते.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शहा यांनी तर आभार शिल्पा म्हैशाळे यांनी मानले.
शिवाजी विद्यापीठ आंतर-विभागीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा : ऋषिकेश, आदित्य, शर्वरी आणि सृष्टी आघाडीवर
|