शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

Shivaji University Online MBA Admission Process Begins


By nisha patil - 1/20/2026 5:55:59 PM
Share This News:



कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) मान्यताप्राप्त ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील जानेवारी २०२६ सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले आहे.

 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रम मागील काही वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात येत असून, प्रवेश, अध्ययन, परीक्षा व निकाल या सर्व शैक्षणिक प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात पार पडणार आहेत. या अभ्यासक्रमातून मिळणारी एम.बी.ए. पदवी ही इतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या एम.बी.ए. पदवीच्या समकक्ष आहे.

 

UGC च्या “एक दर्जा” (Category-I) मानांकन असलेल्या शिवाजी विद्यापीठाने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करून बदलत्या जागतिक शैक्षणिक व औद्योगिक गरजांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचा ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र उपलब्ध करून देत आहे.

 

सुसज्ज Learning Management System (LMS) च्या माध्यमातून विषयतज्ज्ञांनी विकसित केलेली व्हिडीओ व्याख्याने, ई-बुक्स, लाईव्ह काउन्सेलिंग सत्रे, डिस्कशन फोरम, प्रॅक्टिस टेस्ट्स यांसारख्या सुविधांद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन करता येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेल मार्फत रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज शिवाजी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर
 https://www.unishivaji.ac.in/admissions/
या लिंकवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरावा, असे आवाहन संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले आहे.


शिवाजी विद्यापीठातील ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
Total Views: 32