बातम्या
६२ व्या दीक्षांन्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सुसज्ज
By nisha patil - 12/23/2025 6:34:00 PM
Share This News:
६२ व्या दीक्षांन्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सुसज्ज
कोल्हापूर, दि. २३ डिसेंबर: ६२ व्या दीक्षान्त समारंभासाठीच्या सर्व तयारी पूर्ण करीत शिवाजी विद्यापीठ सुसज्ज झाले आहे. विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात उद्या, बुधवार दि. २४ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होत आहे. या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरु तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जी. सतीश रेड्डी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, आंध्र प्रदेश शासनाचे सन्माननीय सल्लागार, माजी अध्यक्ष डीआरडीओ आणि माजी सचिव, संरक्षण विभाग (संशोधन व विकास) संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि अध्यक्ष, अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात एकूण ४९,९०२ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. त्यातील १६,१५९ स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून तर उर्वरित पोस्टाद्वारे पदवी प्राप्त करणार आहेत. समारंभात राज्यशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे-जहागीरदार यांना राष्ट्रपती सुवर्णपदक आणि मानसशास्त्र अधिविभागाची विद्यार्थिनी आर्या संजय देसाई यांना कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने स्नातकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आवाहनानुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा शर्ट (पुरुषांसाठी) तर पांढऱ्या / मोती रंगाची जरीची साडी किंवा सलवार कुर्ता (महिलांसाठी) असा पोषाख परिधान करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फोटो काढत असताना फक्त विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मानवस्त्राचा वापर करुन फोटो काढावेत. अन्य कोणत्याही प्रकारचे गाऊन व टोपीचा वापर करु नये. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानवस्त्राची परतावा अनामत रक्कम रु. ६५०/-आणि भाडे ना परतावा रु. २५/- आकारण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टपालाव्दारे (By Post) पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याचा विकल्प अर्ज भरताना निवडला आहे. त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभ संपन्न झालेवर अर्जावरील पत्यावर पोस्टाने पाठविण्यात येतील. सर्व संलग्नित तसेच स्वायत्त महाविद्यालयांतील ज्या विद्यार्थ्यांनी, अर्ज भरताना In person असा विकल्प निवडला आहे. अशा स्नातकांची पदवीप्रमाणपत्रे, विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभा दिवशी सकाळी ७:३० ते ११:०० या वेळेत आणि समारंभ संपल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजेपर्यत विद्यापीठामध्ये परीक्षा भवन क्रं. २ या ठिकाणी वितरण व्यवस्थेव्दारे वितरीत केली जातील.
(स्नातकांनी पदवीप्रमाणपत्र स्वीकारताना शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र इ. यापैकी एक) वितरण अधिकारी यांना दाखवून पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करावीत.)
६२ व्या दीक्षांत समारंभासाठीच्या व्यासपीठावर देण्यात येणाऱ्या, पीएच.डी. व पारितोषिक प्राप्त स्नातकांची यादी व पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in/62convocation) या सदरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवी प्रमाणपत्र क्रमांक माहितीसाठी विद्यापीठ संकेत स्थळावर दिलेल्या लिंकचा व दिलेल्या क्युआर कोडचा वापर करावा. QR कोड स्कॅन करून प्राप्त लिंकवर क्लिक करून आपला मोबाईल नंबर अथवा PRN नंबर टाकून पदवी प्रमाणपत्र क्रमांक व बुथ क्रमांक प्राप्त करून घेता येईल.
लिंक अशी- https://studentapps.unishivaji.ac.in/findbooth/तरी, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
६२ व्या दीक्षांन्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सुसज्ज
|