शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे भूषणावह नाही! — आमदार सतेज पाटील यांचा संताप
By nisha patil - 10/10/2025 12:15:30 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूपद रिक्त राहिले असून, हे शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणे असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला असतानाही, 9 ऑक्टोबरपर्यंत नवीन प्रभारी कुलगुरूची नियुक्ती करण्यात आली नव्हती. या विलंबामुळे विद्यापीठ प्रशासन गोंधळात असून विद्यार्थी व कर्मचारी वर्गात नाराजीचे वातावरण आहे.
आमदार पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 11(8)” नुसार, राज्यपाल तथा कुलपती यांनी तात्काळ प्रभारी कुलगुरू नेमणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप कोणताही आदेश निघालेला नाही, ही शिक्षण क्षेत्राबाबतची गंभीर अनास्था आहे.”
पाटील पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाला कुलगुरू नसणे हे भूषणावह आहे का?”
शिक्षणाबाबत अशी बेपर्वाई महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी अन्याय करणारी आहे. राज्यपाल कार्यालय आणि उच्च शिक्षण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवाजी विद्यापीठाला कुलगुरू नसणे भूषणावह नाही! — आमदार सतेज पाटील यांचा संताप
|