शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरळीत पार; ७६ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी
By nisha patil - 12/11/2025 11:04:05 AM
Share This News:
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२५ हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या असून त्या सुरळीतपणे पार पडत आहेत. आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., बी.बी.ए., इंटिग्रेटेड बी.एड., बी.व्होक., बी.एस.डब्ल्यू., बी.जे., बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स, बी.एड., एम.एस्सी., एम.जे., एम.सी.ए., एम.बी.ए., एम.ए., एम.कॉम., बी.आय.डी. अशा विविध १२० अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने पार पडल्या.
या परीक्षांसाठी विद्यापीठाने एकूण २०७ परीक्षा केंद्रे स्थापन केली असून ७६,२५८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षेचे सुरळीत आयोजन करण्यासाठी आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठाने विशेष भरारी पथके नियुक्त केली आहेत. दि. ११ नोव्हेंबर रोजी या पथकांनी एकूण २० गैरप्रकारांची नोंद केली असून त्यात कोल्हापूर-१२, सांगली-३ आणि सातारा-५ अशा प्रकरणांचा समावेश आहे.
परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सर्व सूचनांचे पालन करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सुरळीत पार; ७६ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी
|