राजकीय
शिवसेना उबाठाच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयात आढावा बैठकीचे नियोजन
By nisha patil - 6/18/2026 11:17:13 AM
Share This News:
**शिवसेना उबाठाच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयात आढावा बैठकीचे नियोजन*
वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले तक्रारिंचे निरसन*
आजरा(हसन तकीलदार)*:-विविध तक्रारिंचा पाढा घेत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयात शिवसेना उबाठा तर्फे आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विविध समस्या आणि तक्रारी मांडण्यात आल्या. त्या तक्रारीचे व समस्यांचे सकारात्मक पद्धतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी निरसन करीत रुग्णालयातील समस्या आणि अडचणीही समजावून सांगितल्या.
बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ तसेच भूल तज्ञाची आवश्यकता आहे असे सांगितले. महिन्याला 10 ते 15 प्रसूती होतात त्यात पाच ते सहा सीझरियन होतात त्यावेळी गडहिंग्लज वरून बालरोगतज्ञ व भूलतज्ञ बोलवावे लागतात असे सांगितले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील होते तर स्वागत डॉ. सुरजीत पांडव यांनी केले. भूषण इंगवले यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी जि. प. सदस्य व राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई यांनी विविध तक्रारिंचा पाढा वाचला. स्टाफकडून रुग्णांना योग्य वागणूक दिली जात नसल्याची तक्रार केली. उद्धट वर्तन करु नका, उद्धट उत्तरे देऊ नका, रुग्णांची सेवा करायला मिळणे हे पुण्याचे काम आहे. त्यांची सेवा करण्याची संधी मिळते हे तुमचे नसीब आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा असा सल्ला दिला. व ज्या सेविकेने उद्धट बोलले होते तिला बोलावून ताकीद दिली. त्याचप्रमाणे स्वच्छतेबाबतही नाराजी व्यक्त केली. मलिग्रे,वाटंगी उपकेंद्र आणि आजरा ग्रामीण रुग्णालय यांची तुलना करून बघा असा आरसाही दाखवला.
यावर उत्तर देताना अधीक्षक डॉ. अमोल पाटील म्हणाले की, दिवसातून तीन वेळा सफाई केली जाते. परंतु इमारत जुनी असल्याने स्वच्छता दिसून येत नाही. कर्मचाऱ्याकडून उद्धटपणाचे किंवा इतर कोणतेही प्रकार घडणे हे चुकीचे आहे. याबाबत संबंधिताना ताकीद दिली जाईल. तरीसुद्धा अशी घटना घडली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, पुढे असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. ऑक्सिजन प्लांट बंद असल्याचे युवराज पोवार यांनी विचारले असता डॉ. पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ऑक्सिजन प्लांट सुरु आहे. गरजेनुसार सुरु केला जातो. येणारे बिल न परवडणारे असल्याने गरजेनुसार सुरु केले जाते आणि ऑक्सिजन प्लांट सुरु आहे असे सांगितले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी सर्पदंश बाबत विचारले असता सर्पदंश आणि श्वानदंश यांची लस पुरेशी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कॉ. काशिनाथ मोरे यांनी नवीन इमारत केंव्हा पूर्ण होणार असे विचारले व ड्युटी बोर्ड वेळच्यावेळी लिहिण्याची सूचना मांडली. समिरभाई चांद यांनी रुग्णांकडून पैसे घेतले जात असलेबाबत आरोप केला त्याचप्रमाणे विवाह नोंदणीसाठी बारकोड उपलब्ध व्हावा,केसपेपर दुपारी 1:00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची सूचना मांडली.
यावेळी बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, नैसर्गिक व सिझेरियन बाळंतपण यासह विविध विषयावर चर्चा झाली. डॉ. वृषाली केळकर, डॉ. अभिषेक नरहट्टी यांनीही या चर्चेत भाग घेतला. आढाव्यामध्ये शासकीय योजना, लसीकरण व राष्ट्रीय कार्यक्रम, आरोग्यतपासणी, एच.आय.व्ही. तपासणी, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, शवविच्छेदन, गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी, विवाह नोंदणी, मृत्युंनोंदी, डायलेसिस, एन.सी.डी.अंतर्गत मोफत उपचार योजना, आयुष सेवा, दंतसेवा इ बाबत आढावा सादर करण्यात आला.
**यावेळी अतिशय सकारात्मक भूमिका घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी काही तक्रारी असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले. रुग्णांकडून कोणीही पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे एकत्रित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हर्निया, अपेंडिक्स, गर्भाशय शास्त्रक्रिया, हायड्रोसील, मुळव्याध, भगेंद्र, फिशर, लायपोमा व इतर गाठी शस्त्रक्रिया केल्या जातात याचा गरजूनी लाभ घेण्याबाबत आवाहन त्यांनी केले. या शस्त्रक्रिया योजनेंतर्गत येथे होतात हे गरजूपर्यंत पोहचत नाही त्यामुळे हे गरजू पर्यंत पोहचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.*
यावेळी शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, हरिश्चंद्र व्हराकटे, बिलाल लतीफ,सागर नाईक, विलास किल्लेदार, सुयश पाटील, अमित गुरव, महेश पाटील, संजयभाई सावंत, रोहन गिरी, आदी शिवसैनिकांसाह रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना उबाठाच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालयात आढावा बैठकीचे नियोजन
|