शैक्षणिक

तळसंदेतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, पालक वर्गात संताप

Shocking incident of ragging at a school in Talsande


By nisha patil - 10/10/2025 2:29:54 PM
Share This News:



कोल्हापूर :-  हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

हातात बेल्ट, बॅट आणि दांडके घेऊन लहान विद्यार्थ्यांना निर्दयतेने मारहाण करत असल्याचे दृश्य या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसते. गॅलरीत लाईनमध्ये उभ्या केलेल्या विद्यार्थ्यांना एकामागून एक मारहाण करण्यात येत असल्याचे तसेच स्वच्छतागृहातही हातात सापडेल त्या वस्तूने विद्यार्थ्यांवर हल्ला होत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, या हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६, रा. उचगाव, ता. करवीर) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

फिर्यादीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी जखमी विद्यार्थी आणि त्याच्याच वर्गातील पृथ्वीराज कुंभार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर हॉस्टेलमधील संबंधित रेक्टरने पीटी परेडवेळी विद्यार्थ्याला स्टेजवर नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

पेठवडगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओंबाबत ना हॉस्टेल प्रशासनाने, ना पोलिसांनी अधिकृत निवेदन दिलेले नाही.

सध्या सोशल मीडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरत असून, या अमानुष प्रकारामुळे पालक वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतक्या निर्दयी पद्धतीने होत असलेल्या मारहाणीवर संस्थाचालक आणि प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


तळसंदेतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, पालक वर्गात संताप
Total Views: 2073