बातम्या
शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 6/12/2025 6:32:15 PM
Share This News:
शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही - जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. ०६ : कोल्हापूर जिल्ह्याला खेळाचा मोठा वारसा असून, येथील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेण्याची परंपरा कायम रहावी, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला संभ्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दूर केला आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचे खाजगीकरण करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी याविषयी नाहक अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे.
स्थानिक खेळाडू, प्रशिक्षक व पालक यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर येथे विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात आल्या असून, शूटिंग खेळाची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण सुविधा असावी, अशी मागणी प्राप्त झाली होती. मात्र, सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंमध्ये खाजगीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले.
यावेळी चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोल्हापूरमधील स्वप्निल कुसाळे, तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. यांच्याप्रमाणेच अन्य खेळाडू पुढे घडले पाहिजेत, हे विचारात घेऊन विभागीय संकुलातील रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी गतवर्षी सुमारे ३.९० कोटी रुपयांचा निधी खर्च करून ती अद्ययावत करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने संकुलातील रेंज खाजगीकरण करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विभागीय क्रीडा संकुल येथील शूटिंग रेंज खाजगीकरण करण्यात येणार नाही. तथापि, काही लेन भाडेतत्त्वावर मिळावी अशी मागणी आली आहे. शूटिंग रेंजमध्ये सराव करण्यासाठी येत असलेल्या खेळाडूंची संख्या आणि त्यांना प्राधान्य देण्यात येऊन त्यांचे सरासरी प्रमाण किती आहे, हे पाहून ॲकॅडमीला किती शूटिंग लेन द्यायच्या, हा निर्णय घेण्यात येईल. तसेच खेळाडू व प्रशिक्षक यांना उद्भवणाऱ्या अडचणी, प्रशिक्षण माफक शुल्क, वेळ इत्यादी बाबी विचारात घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून शूटिंग रेंज वापरासाठी नियमावली तयार करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.
शूटिंग खेळाच्या प्रगतीसाठी तांत्रिक प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. दर्जेदार प्रशिक्षक पुणे, मुंबई येथे असल्याने कोल्हापूरचे खेळाडूंना अशा ठिकाणी जाण्यासाठी व तेथील प्रशिक्षकांचे शुल्क, भोजन, निवास व इतर खर्च परवडणारा नसतो. तसेच कोल्हापूर येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असतो, यामुळे कोल्हापूर येथेच ॲकॅडमीची आवश्यकता आहे, असे मत काही खेळाडूंनी व्यक्त केले. यावर सविस्तर चर्चा होऊन, संकुलामध्ये शूटिंग प्रशिक्षण जनसामान्य खेळाडूंना परवडेल अशी माफक फी असावी, असा निर्णय घेण्यात आला. तसेच खेळाडूंना प्रशिक्षणासाठी रायफल भाड्याने घ्यावी लागते, यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य देऊन खेळाडूंना सामुग्री प्रशिक्षणासाठी उपलब्ध करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता असल्यास ती करण्यात येईल, असेही श्री. अमोल येडगे यांनी शिष्टमंडळास सांगितले.
यावेळी उपसंचालक (क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर) सुहास पाटील, अर्जुन पुरस्कारार्थी तेजस्विनी सावंत, इंद्रजीत मोहिते, जितेंद्र विभुते, सत्यजित मोहिते, संतोष जाधव, क्रीडा अधिकारी स्नेहळ जगताप, सुशांत हतकर, अनिकेत चरापले, अनिल पवार, सुनिता सावंत तसेच पालक आणि खेळाडू उपस्थित होते.
शूटिंग रेंजचे खाजगीकरण होणार नाही - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|