खेळ
टी-२० संघात श्रेयस अय्यरची दमदार पुनरागमन
By Administrator - 1/17/2026 2:15:34 PM
Share This News:
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. दीर्घ काळानंतर श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा भारताच्या टी-२० संघात स्थान देण्यात आले असून दुखापतग्रस्त तिलक वर्माच्या जागी त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र, अय्यरला केवळ पहिल्या तीन सामन्यांसाठीच संधी देण्यात आली आहे.
तिलक वर्मा कमरेच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे आधीच मालिकेतून बाहेर पडला होता. या पार्श्वभूमीवर निवड समितीने अनुभवाला प्राधान्य देत श्रेयस अय्यरला संघात परत बोलावले आहे. अय्यरसाठी ही टी-२० क्रिकेटमधील पुनरागमनाची महत्त्वाची संधी मानली जात आहे.
दरम्यान, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागणार आहे. गोलंदाजी करताना त्याला बरगडीच्या भागात तीव्र वेदना जाणवल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत साइड स्ट्रेन झाल्याचे निदान झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुंदरला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, पुढील उपचारांसाठी तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होणार आहे.
सुंदरच्या अनुपस्थितीत फिरकी विभाग मजबूत करण्यासाठी निवड समितीने रवी बिश्नोईची निवड केली आहे. बिश्नोईने आतापर्यंत ४२ टी-२० सामन्यांत ६१ बळी घेतले असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच्या निवडीमुळे भारतीय गोलंदाजीला आणखी धार येण्याची अपेक्षा आहे.
२१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
सुधारित भारतीय टी-२० संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन सामने), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक) आणि रवी बिश्नोई
टी-२० संघात श्रेयस अय्यरची दमदार पुनरागमन
|