बातम्या

सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे ‘श्री लोकमान्य तरुण मंडळ’ — टाकळीवाडीचा मानबिंदू

Shri Lokmanya Tarun Mandal


By nisha patil - 1/9/2025 4:03:36 PM
Share This News:



सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे ‘श्री लोकमान्य तरुण मंडळ’ — टाकळीवाडीचा मानबिंदू

मुस्लिम समाजालाही आरतीचा मान देत गावातले ऐक्य जपणारे आदर्श मंडळ

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री लोकमान्य तरुण मंडळ हे गावातील सर्व जाती-धर्मांना एकत्र आणणारे आदर्श मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे. ३१ ऑगस्ट १९९२ रोजी स्थापना झालेल्या या मंडळात तब्बल १७ पगडी जातींचा समावेश असून, आजही एकतेचा दिमाखाने उभा असलेला हा मंडळ गावाचा मानबिंदू ठरतो.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत या मंडळाकडून गणेशोत्सवात मुस्लिम समाजालाही आरतीचा मान दिला जातो. त्यामुळे गणेशोत्सव हा गावातील सर्व समाज बांधवांचा सामूहिक उत्सव ठरतो. महिला, पुरुष आणि लहान मुलं सर्वजण गुण्यागोविंदाने सहभागी होऊन गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

या मंडळाने सामाजिक क्षेत्रातही अनेक उपक्रम राबवले आहेत. रक्तदान शिबिर, समाज प्रबोधनपर नाटिका, हिप्नॉटिझम, संगीत खुर्ची यांसारखे उपक्रम यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत. गावात सर्वप्रथम महाप्रसादाची परंपरा सुरू करण्याचा मानही या मंडळाला मिळतो. त्यांच्या कार्याची दखल घेत २०१८ मध्ये कुरुंदवाड पोलीस स्टेशनकडून गणराया अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.

गेल्या तीन दशकांत या मंडळाने विविध देव-देवतांच्या रूपातील १३ फूट उंचीपर्यंतच्या भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केली असून, टाकळीवाडीच्या एकतेचे व सामाजिक कार्याचे प्रतीक म्हणून हे मंडळ सतत पुढे येत आहे.


सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे ‘श्री लोकमान्य तरुण मंडळ’ — टाकळीवाडीचा मानबिंदू
Total Views: 59