राजकीय

शिप्पूरचे श्री. रामलिंग देवस्थान या परिसराचे तीर्थस्थळ बनेल - मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Shri Ramalinga Devasthan of Shippur will become a pilgrimage site of this area


By nisha patil - 12/5/2026 11:16:06 AM
Share This News:



शिप्पूरचे श्री. रामलिंग देवस्थान या परिसराचे तीर्थस्थळ बनेल - मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
       
श्री रामलिंग मंदिराचा वास्तुशांती, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात, एक कोटीमधून साकारले आरभावी दगडातील सुंदर आखीव- रेखीव मंदिर. शिपुर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज येथील पवित्र श्री. रामलिंग मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचे वास्तव्य आहे. जीर्णोद्धार केलेले हे मंदिर या पंचक्रोशीचे तीर्थस्थळ बनेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 
      
शिप्पूर तर्फ आजरा ता. गडहिंग्लज येथे श्री. रामलिंग मंदिराच्या वास्तुशांती, होम हवन व कलशारोहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर होते. 
           
मंत्री श्री. मुश्रीफ यांचा रु. ६५ लाख निधी आणि ग्रामस्थांची लोकवर्गणी रू. ३५ लाख, असे एक कोटी निधीतून श्री. रामलिंग मंदिराचे आखीव- रेखीव असे सुंदर मंदिर ग्रामस्थांनी साकारले आहे.
           
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय कै. बाबासाहेब कुपेकरसाहेब या विभागाचे नेतृत्व करीत होते आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा भाग कागल विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला. त्यानंतर या भागात फिरताना रस्ते बघून पहिल्यांदा माझ्या पोटात धस्स झालं.  मी ही सगळी परिस्थिती विकासकामांच्या रूपाने बदलण्याचे ठरविले. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी सुचवलेले विकासाची एकही काम शिल्लक ठेवलेले नाही. 
           
यापूर्वी उत्तूर विभागातील २२ गावांचा हा भाग पूर्णतः कोरडवाहू होता. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरसाहेब यांनी १९९९ साली आंबेओहळ या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली. परंतु; हा प्रकल्प रखडला. श्री. रामलिंगाच्या कृपेने जलसंपदा खाते माझ्याकडे आल्यानंतर विशेष पॅकेज आणून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाला गती दिली.
          
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर म्हणाले, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून या गावाच्या शेत- शिवारात आंबेओहळचे पाणी फिरत आहे. मंदिरासह विकासकामांमधून या गावाचे रुपडे पालटले आहे. श्री रामलिंग मंदिर एक जागरूक देवस्थान म्हणून सर्वदूर लौकिक आहे. १५ वर्षांपूर्वी या रखडलेल्या बांधकामाबाबत ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना भेटले. त्यावेळी त्यांनी या मंदिरासाठी तीन टप्प्यात निधी देऊ असा शब्द दिला होता. त्यांचा रू. ६५ लाख रुपये निधी आणि ग्रामस्थांची रू. ३५ लाख रुपये लोकवर्गणी, असे एक कोटी रुपयांतून कर्नाटकातील आरभावीच्या लाल दगडातील हे सुंदर आखीव- रेखीव मंदिर साकारले आहे.

 

शिल्पकलेतील बांधकाम
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या मंदिरांच्या बांधकाम शुभारंभापासून पूर्णत्वापर्यंत अनंत अडचणी आल्या. परंतु; ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे या सर्व अडचणीवर मात करीत मंदिर पूर्ण झाले, याचा मला विशेष आनंद आहे. शिल्पकलेतील दगडी बांधकाम करायचे, असा ग्रामस्थांचा अट्टाहास होता. आज एक सुंदर आणि देखणी मंदिराची कलाकृती पाहिल्यानंतर ग्रामस्थांची म्हणणे किती बरोबर होते,  याचा मला प्रत्यय आलेला आहे.
          
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शैलजा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर, पंचायत समिती सदस्या सौ. सुनिता देसाई, बंटी पाटील, सरपंच गीतांजली राशिवडेकर, उपसरपंच जितेंद्र कांबळे, सचिन देसाई, विजय राशीवडेकर, विनोद पाटील, रामचंद्र कानडे, सुरेश कोकितकर, सुरेश केसरकर, गोपीनाथ केसरकर, अरुण सावंत, पांडुरंग शेवाळे, वसंत सावंत,  प्रशांत हेरले आदी प्रमुख उपस्थित होते.


 


शिप्पूरचे श्री. रामलिंग देवस्थान या परिसराचे तीर्थस्थळ बनेल - मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
Total Views: 22