बातम्या
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाचा समाजमनाला भिडणारा देखावा; . पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी
By nisha patil - 9/19/2026 2:16:50 PM
Share This News:
‘पुरुष होणे सोपे नाही’ सांगणारा हृदयस्पर्शी ‘कौटुंबिक योद्धा’ देखावा सादर...................
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाचा समाजमनाला भिडणारा देखावा; . पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी.............
दत्तवाड प्रतिनिधी : दत्तवाड येथील श्री सेवा गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘कौटुंबिक योद्धा’ हा हृदयस्पर्शी आणि समाजमनाला अंतर्मुख करणारा देखावा सादर केला आहे. पुरुषाच्या आयुष्यातील खडतर संघर्ष, कुटुंबासाठी त्याने केलेला त्याग, आर्थिक अडचणींशी दिलेली झुंज आणि मनातील वेदना व्यक्त न करता कर्तव्य बजावत राहण्याची त्याची धडपड या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
“पुरुष होणे सोपे नाही...
वेदना मनात दडवाव्या लागतात,
डोळ्यांत अश्रू असले तरी हसतच जगावं लागतं.
कर्तव्यांच्या ओझ्याखाली स्वतःला विसरावं लागतं,
कारण पुरुष असल्याने प्रत्येक वेळी खंबीरच राहावं लागतं...”
या आशयाने साकारलेल्या देखाव्याने गणेशभक्तांच्या मनाला अक्षरशः हात घातला. कुटुंबासाठी आयुष्यभर झटणाऱ्या पुरुषाच्या संघर्षाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या या देखाव्याची परिसरात चर्चा रंगली असून, देखावा पाहण्यासाठी नागरिक व गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी गणेशमूर्तीचे फोटोपूजन तसेच श्रीफळ वाढविण्याचा मान शंकर मिरजे, शेखर अंबुपे, संजय माने आणि संजय पाटील-शिरदवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. तर ‘कौटुंबिक योद्धा’ देखाव्याचे उद्घाटन पत्रकार आचिन हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.. ...............संघर्षाची कहाणी पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांक
घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारा पुरुष, आर्थिक संकटातही कुटुंबाला आधार देणारा पिता, पती, भाऊ आणि मुलगा यांची संघर्षमय कहाणी या देखाव्यातून जिवंत करण्यात आली आहे. त्यामुळे हा देखावा केवळ मनोरंजनाचा विषय न राहता प्रत्येक कुटुंबातील पुरुषाच्या न बोललेल्या वेदनांना आवाज देणारा ठरला आहे.
देखाव्याचे सादरीकरण पाहण्यासाठी दत्तवाडसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती प्रेक्षकांच्या तुफान गर्दीने यंदाच्या गणेशोत्सवातील गर्दीचे अनेक विक्रम मोडल्याचे चित्र दिसून येत आहे. भावनिक प्रसंगांवर अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत असून, देखावा पाहिल्यानंतर “ही तर आपल्या घरातीलच संघर्षाची कहाणी आहे”, अशी प्रतिक्रिया गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाचा ‘कौटुंबिक योद्धा’ हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील लक्षवेधी सामाजिक संदेश देणारा देखावा ठरला. या देखाव्यात प्रमोद हिटनाळे, सुनील मिरजे, शेखर माने, सौरभ पाटील, साई हेरवाडे, रोहन पाटील, प्रविण कलगी आणि मनस्वी मालिकवाडे यांनी सहभागी कलाकार म्हणून प्रभावी भूमिका साकारली.
श्री सेवा गणेशोत्सव मंडळाचा समाजमनाला भिडणारा देखावा; . पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी
|