बातम्या
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवजयंती व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
By nisha patil - 2/19/2026 10:10:42 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवजयंती व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात इतिहास विभाग आणि आयक्यूएसी (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव व आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण हे होते. त्यांच्या हस्ते 'युनेस्को'ने (UNESCO) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांच्या विशेष भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. डॉ. शानेदिवाण यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाची माहिती मिळाली असून, तो जतन करण्याची जाणीव निर्माण होईल अशी अशा व्यक्त केली.
या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार' या विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली मते मांडली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. संतोष जेटीथोर व डॉ. राजकिरण बिरजे यांनी केले. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यासाठी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे (दादा) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एस. व्ही. शिखरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सौ. डॉ. पी. आर. भुयेकर यांनी केले, तर डॉ. एस. डी. रायजादे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी श्री. आर. जे. भोसले, श्री. मनीष भोसले डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, डॉ. पी. बी. पाटील, प्रा. आर. एस. शेणेकर आदिसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात शिवजयंती व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
|