बातम्या
*कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा
By nisha patil - 10/31/2026 9:24:43 PM
Share This News:
*कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा
आजऱ्यातील भव्य ओपन कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न; १६ संघांचा सहभाग
*आजरा(हसन तकीलदार): आजरा तालुक्याचे ज्येष्ठ तथा भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते कै.बाबुरावजी कुंभार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त कै. बाबुरावजी कुंभार विचार मंचच्या वतीने आयोजित भव्य ओपन कबड्डी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. गुरुवार, दि. २९ व शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पंडित दीनदयाळ विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक अण्णा चराटी, मुकुंद दादा देसाई, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, दयानंद भुसारी, सुधीर मुंज तसेच नगरपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित १६ कबड्डी संघांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यांमुळे कबड्डीप्रेमींना दर्जेदार खेळाचा आनंद घेता आला. आजऱ्यातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणीच ठरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अत्यंत अटीतटीच्या सामन्यांनंतर शृंगारवाडी वॉरियर्स संघाने अंतिम विजेतेपद पटकावत कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर आपले नाव कोरले. शिवमुद्रा कौलव संघाने द्वितीय, मडिलगे संघाने तृतीय, तर नवभारत शिरोली संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.तर आदर्श संघ म्हणून रवळनाथ कडलगे,उत्कृष्ट खेळाडू निखिल बर्गे,उत्कृष्ट पकड राजवर्धन लोंढे,उत्कृष्ट चढाई अभिषेक गुंगे यांनी वैयक्तिक व विशेष पुरस्कार पटाकावले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भैय्यासाहेब आबिटकर, भारती ताई जाधव, श्रीमती सोनाबाई बाबुराव कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कैलासवासी बाबुरावजी कुंभार यांचे चिरंजीव सुधीर कुंभार (उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर जिल्हा तथा व्हाईस चेअरमन, स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, आजरा) आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांच्या नेटक्या व अभ्यासपूर्ण नियोजनामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी दिशा मिळाली आणि रंगत आली.
शिवाजी बोलके, शिवाजी पारळे,प्रकाश प्रभू, धनाजी पारपोलकर आणि प्रदीप पाचवडेकर यांनी स्पर्धा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेचे प्रभावी निवेदन अनिल कांबळे यांनी केले.
कैलासवासी बाबुरावजी कुंभार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच ग्रामीण भागातील कबड्डीपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या स्पर्धेचा उद्देश होता. खेळाडूंना प्रोत्साहन देणारा आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम आजऱ्यातील क्रीडाप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.
*कैलासवासी बाबुरावजी कुंभार स्मृती चषकावर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा
|