ताज्या बातम्या
सरोळीत सिद्ध पादुका दर्शन सोहळा आणि घरघंटींचे वाटप
By nisha patil - 8/12/2025 11:43:44 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार) : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ, नाणीजधाम (रत्नागिरी) यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सरोळी (ता. आजरा) येथे सकाळी ९ पासून करण्यात आले आहे. या आध्यात्मिक सोहळ्यासोबत ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत १६ गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंट्या मोफत वाटप केले जाणार आहे.
दि. ९ डिसेंबर रोजी गुरुपादुका सरोळीतील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहतील. पादुका पूजन, स्वागत व भजन सोहळा संपन्न होईल. दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता गावातून पादुकांची भव्य रथयात्रा निघून मुख्य मार्गांवरून कार्यक्रमस्थळी दाखल होईल. सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत घरघंट्यांचे वाटप होईल.
यानंतर गुरुपूजन, आरती, तसेच ज.न.म. प्रवचनकार भूषण सौ. गौराताई चौगुले यांचे प्रवचन होईल. रामानंद संप्रदायामध्ये नव्याने सहभागी होणाऱ्या भक्तांना उपासक दीक्षा दिली जाईल. पादुका दर्शनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाला १० ते १५ हजार भक्तगण उपस्थित राहतील असा अंदाज असून सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे. कोल्हापूर जिल्हा सेवा समिती तसेच आजरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली असून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सोहळ्याची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे.
सरोळीत सिद्ध पादुका दर्शन सोहळा आणि घरघंटींचे वाटप
|