बातम्या
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक
By nisha patil - 10/31/2025 10:47:52 PM
Share This News:
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पोलिसांची कारवाई!
कोल्हापूर : महाराष्ट्राचा नामांकित पैलवान आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक तपासात उघड झाला असून, राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या अटकेनंतर संपूर्ण कुस्तीविश्वात खळबळ उडाली आहे. राज्यातील कुस्तीप्रेमी आणि चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी बोलण्यास नकार दिला असून, “आमच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सिकंदर शेखने 2024 मध्ये महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब जिंकून स्वतःचं नाव गाजवलं होतं. त्याआधी 2023 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. त्या वेळी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सिकंदरच्या समर्थनार्थ जोरदार मोहीम उभी केली होती. त्याच्या आक्रमक खेळशैलीमुळे आणि प्रखर वक्तृत्वामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे.
अलीकडेच पंढरपूरजवळ भीमा साखर कारखान्यावर झालेल्या भीमा केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदरने “मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे” असे वक्तव्य करून चर्चेत आला होता.
मात्र, आता अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात झालेल्या अटकेमुळे राज्यातील कुस्तीविश्व हादरले आहे. काहीजण त्याच्या बाजूने उभे राहत असतानाच, काहीजणांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणातील पुढील तपास पंजाब पोलिसांकडून सुरू असून, लवकरच या अटकेमागील संपूर्ण पार्श्वभूमी उघड होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक
|