व्यवसाय
सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना
By nisha patil - 6/30/2026 1:01:33 PM
Share This News:
प्रतिनिधि : शुभम गवस
सिंधुदुर्ग : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सहकार ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमात 'सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित' या नव्या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची, तर चेअरमनपदी संदेश हडकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनीष दळवी यांनी सहकार क्षेत्रातील अनुभवी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम, प्रभावी आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थेमार्फत विविध सहकारी संस्थांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, सहकार विभागाचे अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, अधिकारी, सभासद तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
सहकार सप्ताहाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्थेची स्थापना
|