बातम्या
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा; हिंदू समाजाच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय : नितेश राणे..
By nisha patil - 6/15/2026 5:35:38 PM
Share This News:
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा; हिंदू समाजाच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय : नितेश राणे..
सिंधुदुर्ग गवस शुभम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाने विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या दिशेने मोठी वाटचाल केली असून हिंदू समाजाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
केंद्रातील मोदी सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, २०१४ पूर्वी देशात तुष्टीकरणाच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात होते. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात त्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला असून देशात हिंदू अस्मिता आणि सांस्कृतिक वारशाला नव्याने बळ मिळाले आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासामुळे भारताच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर नवे स्थान प्राप्त झाले आहे.
उज्जैन येथील महाकालेश्वर कॉरिडोरसारखे प्रकल्प राबवून धार्मिक पर्यटनाला चालना देण्यात आली असून भारतीय संस्कृतीचा गौरव जगभर पोहोचविण्याचे काम केंद्र सरकारने केले असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी राष्ट्रप्रमुखांना ‘भगवद्गीता’ भेट देण्याच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
वक्फ कायद्यात आवश्यक सुधारणा करून हिंदू समाजाच्या जमिनींच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यात आली आहेत. तसेच समान नागरी कायद्याच्या दिशेने देश वाटचाल करत असून विविध संवेदनशील विषयांवर सरकारने ठाम भूमिका घेतल्याचे राणे यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आज भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा अधिक सक्षम आणि प्रभावी झाली आहे. दहशतवादाविरोधातील कठोर धोरणामुळे देशाची सुरक्षा अधिक बळकट झाली असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस कोणालाही होत नाही.
ट्रिपल तलाकविरोधी कायदा लागू करून मुस्लिम महिलांना न्याय देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. तसेच तरुण पिढी देशविघातक शक्तींविरोधात ठामपणे उभी राहत असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील युवकांचा दृढ विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
देशसेवेत उल्लेखनीय योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास रचला असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक पटलावर आणखी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा; हिंदू समाजाच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय : नितेश राणे..
|