बातम्या
फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला; ठेकेदार व अभियंत्यांच्या हलगर्जीपणाचा चौकशी अहवाल
By nisha patil - 1/10/2025 9:28:29 PM
Share This News:
फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला; ठेकेदार व अभियंत्यांच्या हलगर्जीपणाचा चौकशी अहवाल
कोल्हापूर : दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 ते 9.00 च्या दरम्यान फुलेवाडी अग्निशमन केंद्र विकास व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा स्लॅब कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली होती. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली होती. समितीने आपला अहवाल आज (दि. 1 ऑक्टोबर) सादर केला असून त्यात ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 49 लाख 86 हजार 361 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. 22 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता मिळून 6 ऑगस्ट 2024 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ जुन 2025 मध्ये झाला होता. यात तळमजल्यावर स्टेशन ऑफिसर केबीन, कंट्रोल रुम, स्टोअर, टॉयलेट तसेच दोन फायर फायटींग गाड्यांसाठी जागा, तर पहिल्या मजल्यावर वेटींग रुम व टॉयलेटची तरतूद होती.
समितीच्या तपासानुसार,
स्लॅब टाकण्यापूर्वी स्ट्रक्चरल इंजिनिअरचा पाहणी अहवाल घेणे आवश्यक असतानाही तो न घेतल्याने ठेकेदाराकडून हलगर्जीपणा झाला.
कॉक्रीट स्लॅब टाकण्यासाठी उभारण्यात आलेली ट्रॉली दोन पोलवर उभारण्यात आली होती; प्रत्यक्षात ती चार पोलवर उभारणे आवश्यक होते. त्यामुळे झालेल्या व्हायब्रेशनमुळे स्लॅब कोसळल्याचे दिसून आले.
दिवसा तांत्रिक दक्षता घेऊन काम करणे अपेक्षित असताना रात्रीच्या वेळी स्लॅब टाकल्याने अपघाताची शक्यता वाढली.
साईट इंजिनिअर उपलब्ध न ठेवता फक्त सेंट्रींग ठेकेदाराकडून काम करून घेतले गेले, हेही दुर्घटनेचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले.
विभागीय कार्यालय क्र. 2 चे कनिष्ठ अभियंता यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहणे आवश्यक असतानाही त्यांनी फक्त सकाळ-सायंकाळ भेट दिली. त्यामुळे त्यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या चौकशी अहवालामुळे ठेकेदारासोबतच महापालिकेच्या अभियंत्यांवरही जबाबदारी निश्चित होणार आहे. दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला असला तरी बांधकामातील निष्काळजीपणामुळे भविष्यातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला; ठेकेदार व अभियंत्यांच्या हलगर्जीपणाचा चौकशी अहवाल
|