बातम्या
तोंडी,प्रात्यक्षिक अन् कृपांकाचा टेकू हळूवार करा दूर!
By nisha patil - 11/25/2026 3:42:56 PM
Share This News:
तोंडी,प्रात्यक्षिक अन् कृपांकाचा टेकू हळूवार करा दूर!
कोकण व कोल्हापूर मंडळाचा निकाल विश्लेषण आणि उद्दिष्टाचा अभिनव आराखडा.
कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळांनी 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे' या उपक्रमात आणखी एक संवेदनशील आणि भक्कम पाऊल टाकले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक नियोजनानंतर आता फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकालाचे सखोल सांख्यिकी विश्लेषण आणि २०२७ साठी उद्दिष्टाधारित कृती आराखड्याची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहे. विविध सामाजिक-शैक्षणिक पार्श्वभूमीतून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ उत्तीर्ण होण्यापुरते मर्यादित न ठेवता त्याच्या अंगभूत गुणवत्तेला झळाळी देण्याचा हा प्रयत्न आहे.
केवळ उत्तीर्णांची टक्केवारी न पाहता प्रत्येक गुणश्रेणीतील स्थिती, ग्रेस(कृपांक)गुणांचे अवलंबित्व, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेतील उत्तम गुणांनंतरही लेखी परीक्षेत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा याचे वास्तववादी चित्र या विश्लेषणातून समोर आले आहे. तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम गुण मिळवूनही लेखी परीक्षेत कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन, आकलन, शुद्धलेखन, वैज्ञानिक संकल्पना व वेळबद्ध उत्तरलेखनाचा आधार दिल्यास त्यांच्या आत्मविश्वासाची इमारत उभी राहू शकते. ग्रेस गुणांवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कष्टाने व गुणवत्तेने यश संपादन करावे, यासाठी उपचारात्मक अध्यापन, नियमित सराव आणि पालक संवादाची जोड देण्यात आली आहे.
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक, विषय, शाळा, शाखा आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रत्येक स्तरावर उपलब्ध मनुष्यबळ व वेळेनुसार उपाययोजना ठरवण्याचे व राबवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी हा आराखडा स्वतःच्या स्तरावर तयार करून अभिलेखात जतन करायचा आहे.
"दहावीसाठी शिक्षक, विषय, शाळास्तर तर बारावी साठी शिक्षक, विषय, शाखा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तर असे विश्लेषण व उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. हा आराखडा ज्या त्या स्तरावर तयार करून जतन करावयाचा आहे त्यानुसार निकालातील गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना करण्याबाबत, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साध्य करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही माहिती विभागीय मंडळाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही."
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोकण व कोल्हापूर मंडळ.
- उद्दिष्ट आधारित आराखड्याच्या ठळक बाबी..
* फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या दहावी व बारावी परीक्षेसाठी मागील निकालाचे सांख्यिकी विश्लेषण करून उद्दिष्टाधारित कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* दहावीसाठी शिक्षक, विषय व शाळास्तर तर बारावीसाठी शिक्षक, विषय, शाखा (कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक) व कनिष्ठ महाविद्यालय स्तर असे स्वतंत्र तक्ते निश्चित केले आहेत.
* गुणश्रेणीनिहाय विश्लेषणात ९० ते १०० टक्के हा अधिकचा उच्च टप्पा स्वतंत्रपणे नोंदवून एकूण सहा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे.
* सवलतीच्या (ग्रेस) गुणांवरील अवलंबित्व ५० टक्क्यांनी कमी करून विद्यार्थ्यांनी स्वबळावर उत्तीर्ण होण्यावर भर दिला आहे.
* भाषा विषयांतील तोंडी (२० गुण) व लेखी (८० गुण) परीक्षेतील तफावत कमी करण्यासाठी लेखी १ ते १० गुण गटात ५० टक्के आणि ११ ते २० गुण गटात २५ टक्के कपातीचे उद्दिष्ट आहे.
* दहावी विज्ञान व बारावी विज्ञान तसेच प्रात्यक्षिक विषयांतील प्रात्यक्षिक व लेखी गुणांची तफावत कमी करण्यासाठी स्वतंत्र तक्ते व कृती निश्चित केल्या आहेत.
* प्रत्येक तक्त्याखाली संबंधित स्तरास लागू उपाययोजना नोंदवून शिक्षक, विषयप्रमुख, शाखाप्रमुख व प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षऱ्या अनिवार्य केल्या आहेत.
* उपलब्ध मनुष्यबळ, वेळ व स्थानिक स्थिती लक्षात घेऊन उपाययोजना निश्चित व अंमलात आणण्याची लवचिकता व स्वातंत्र्य संबंधित स्तरांना दिले आहे.
* मासिक, घटक चाचणी व प्रथम सत्र परीक्षेनंतर प्रत्यक्ष प्रगती व उद्दिष्टांची तुलना करून आवश्यकतेनुसार सुधारित आराखडा तयार करायचा आहे.
* तयार केलेला कृती आराखडा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अभिलेखात जतन करायचा असून विभागीय मंडळाकडे कोणतीही माहिती पाठवण्याची आवश्यकता नाही.
सांख्यिकी विश्लेषण आणि उद्दिष्ट यातील ठळक बाबी..
* कोल्हापूर विभागीय मंडळाच्या दहावीच्या एकत्रित नियमित परीक्षार्थ्यांची संख्या २०२६ मध्ये १,३०,९७६ असून ७५ टक्क्यांपुढे ४२,९०५ (३२.७६ टक्के) आणि ६०-७५ टक्के श्रेणीत ४३,०७० (३२.८८ टक्के) विद्यार्थी होते.
* कोल्हापूर विभागीय मंडळात दहावीसाठी २०२७ मध्ये ७५ टक्क्यांपुढे ४७,१९६ (३६.०३ टक्के) आणि ६०-७५ टक्के श्रेणीत ४७,३७७ (३६.१७ टक्के) अशी प्रत्येकी १० टक्के वाढीचे उद्दिष्ट आहे, तर ३५ टक्क्यांपेक्षा कमी श्रेणीतील सर्व ५,४२७ विद्यार्थ्यांना शून्यावर आणण्याचे लक्ष्य आहे.
* कोल्हापूर विभागीय मंडळाच्या दहावीत २०२६ मध्ये १७,२०६ (१३.१४ टक्के) विद्यार्थी ग्रेस गुणांनी उत्तीर्ण झाले असून २०२७ मध्ये ही संख्या ५० टक्क्यांनी घटवून ८,६०३ (६.५७ टक्के) करण्याचे उद्दिष्ट आहे.
* कोल्हापूर विभागीय मंडळाच्या बारावीत (सर्व शाखा एकत्रित) २०२६ मध्ये १,१३,४१० नियमित परीक्षार्थी होते; २०२७ मध्ये ७५ टक्क्यांपुढे ५,६६० वरून ६,२२६ (+१० टक्के) आणि ६०-७५ टक्के श्रेणीत २१,२७२ वरून २३,३९९ (+१० टक्के) उद्दिष्ट ठेवले आहे.
* कोल्हापूर विभागीय मंडळाच्या बारावीत ३५ टक्क्यांपेक्षा कमी श्रेणीतील ६,५०२ विद्यार्थ्यांचे प्रमाण शून्यावर आणण्याचे आणि ग्रेस गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या ४६,५९२ (४१.०८ टक्के) विद्यार्थ्यांची संख्या २३,२९६ (२०.५४ टक्के) वर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
* कोकण विभागीय मंडळाच्या दहावीत २०२६ मध्ये २७,४७८ नियमित परीक्षार्थी होते; २०२७ मध्ये ७५ टक्क्यांपुढे ७,१७७ वरून ७,८९४ (+१० टक्के) आणि ६०-७५ टक्के श्रेणीत ९,०३३ वरून ९,९३६ (+१० टक्के) लक्ष्य निश्चित केले आहे.
* कोकण विभागीय मंडळाच्या दहावीत ३५ टक्क्यांपेक्षा कमी श्रेणीतील ५५९ विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट शून्य असून ग्रेस गुणांवरील ३,३४९ (१२.१९ टक्के) विद्यार्थ्यांची संख्या १,६७५ (६.१० टक्के) पर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे.
* कोकण विभागीय मंडळाच्या बारावीत २०२६ मध्ये २३,६४५ नियमित परीक्षार्थी होते; २०२७ मध्ये ७५ टक्क्यांपुढे १,२८५ वरून १,४१४ (+१०.०४ टक्के) आणि ६०-७५ टक्के श्रेणीत ४,५२४ वरून ४,९७६ (+९.९९ टक्के) उद्दिष्ट ठेवले आहे.
* कोकण विभागीय मंडळाच्या बारावीत ३५ टक्क्यांपेक्षा कमी श्रेणीतील ७७४ विद्यार्थ्यांचे लक्ष्य शून्य असून ग्रेस गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या ८,५६७ (३६.२३ टक्के) विद्यार्थ्यांची संख्या ४,२८४ (१८.१२ टक्के) करण्याचे उद्दिष्ट आहे.
* श्रेणीनिहाय उद्दिष्ट निश्चित करताना ९० ते १०० व ७५ ते ८९ या श्रेणींत प्रत्येकी किमान ५ टक्के (एकत्रित ७५ ते १०० मध्ये १० टक्के) आणि ६० ते ७४ श्रेणीत १० टक्के वाढ पूर्णांकात मोजून घ्यावयाची आहे.
तोंडी,प्रात्यक्षिक अन् कृपांकाचा टेकू हळूवार करा दूर!
|