बातम्या
स्मार्ट मीटरची हानी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
By nisha patil - 6/27/2026 8:52:04 PM
Share This News:
*स्मार्ट मीटरची हानी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा*
*स्मार्ट मीटरबाबत अफवांवर विश्वास न ठेवता कार्यालयाशी संपर्क साधा : महावितरणचे आवाहन*
*सांगली/कोल्हापूर, दि. २७ जून २०२६ :* कोकरूड (ता. शिराळा, जि. सांगली) येथे स्मार्ट मीटरची जाणीवपूर्वक हानी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या मालमत्तेचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच स्मार्ट मीटरविषयी काही शंका अथवा तक्रारी असल्यास त्या महावितरण कार्यालयात मांडाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महावितरणकडून केंद्र शासनाच्या रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम (RDSS) अंतर्गत राज्यभर नियमानुसार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. कोकरूड येथेही बहुतांश ग्राहकांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या परिसरातील एका ग्राहकाला बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची जाणीवपूर्वक हानी केल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे महावितरणच्या मालमत्तेचे सुमारे ५,२०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
या प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता शिवदास देशमाने यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अनिल मारुती घोडे-पाटील व महादेव बापू खवळे (रा. कोकरूड, ता. शिराळा) यांच्याविरुद्ध विद्युत अधिनियम, २००३, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया*
राज्यात केंद्र शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम करणे हा आहे. स्मार्ट मीटर हे महावितरणची मालमत्ता असल्याने त्यांची बदली अथवा स्थापना करण्यासाठी ग्राहकांच्या स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
महावितरणने नागरिकांना सोशल मीडियावरील अपप्रचार व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्मार्ट मीटरसंदर्भातील कोणतीही माहिती, शंका किंवा तक्रार असल्यास संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट मीटरची हानी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
|