शैक्षणिक
सामाजिक न्याय विभागाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कालबाह्य; 17 वर्षांत एक रुपयाही वाढ नाही
By nisha patil - 11/22/2025 1:59:23 PM
Share This News:
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे उपस्थिती भत्ता (शिष्यवृत्ती) योजना राबवली जाते. मात्र या योजनेत 2007 नंतर आजपर्यंत एक रुपयांचीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या योजनेचा मूळ उद्देशच हरताळला गेल्याची टीका होत आहे.
जिल्ह्यातील या प्रवर्गातील सुमारे 25 हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतात. इयत्ता 5 वी ते 7 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 60 रुपये, तर 8 वी ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. दहा महिन्यांसाठी मिळणारी ही रक्कम महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत तोकडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांमध्ये समन्वय नसल्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, मुलींचा शैक्षणिक सहभाग वाढवणे व बालविवाह रोखणे या उद्देशाने मुलींना उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात गेल्या 17 वर्षांत भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. परिणामी मुलांची शाळाबाहेर गळती वाढत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
महागाईत मोठी वाढ, तसेच अधिकारी-कर्मचारी यांचे वेतन आणि भत्ते वाढले असताना गरीब विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ न होणे अन्यायकारक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सरकारने हा भत्ता वाढवून किमान प्रतिदिन 20 रुपये करावा, अशी मागणी होत आहे.
सामाजिक न्याय विभागाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कालबाह्य; 17 वर्षांत एक रुपयाही वाढ नाही
|