शैक्षणिक
यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक मूल्यांची समाजाला गरज : प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण
By nisha patil - 11/25/2025 12:50:36 PM
Share This News:
कोल्हापूर: भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक आदर्शाची आज समाजाला मोठी गरज असल्याचे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण व्यक्ती आणि विचार असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले .
प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण म्हणाले, संस्काराचे वर्ग भरणाऱ्या आजच्या जगात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक मूल्यांची आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाची सर्वांना गरज आहे.त्यांचे विचार, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक कार्य अजही प्रेरणादायी आहे. त्यांच्यावरील विचार,संस्कार हे त्यांच्या आई विठाई यांच्याकडून झाले होते.
ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण 17 - 18 वर्षाचे असताना ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून त्यांनी तिरंगा फडकवला होता. स्वतंत्र लढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना 17 महिन्याची शिक्षाही झाली होती. 1928 चा तो कालावधी स्वातंत्र्याच्या प्रेरणेने भारावलेला होता. भगतसिंग यांनीही याच कालावधीत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ, वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रांचे विदेश दर्शन हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आवाहन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण यांचे विचार, कार्य याबरोबरच त्यांनी पी. एन. पाटील यांच्या बरोबर असणाऱ्या काही आठवणी उजाळा दिला .
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रचना माने यांनी केले. डॉ. डी. के. वळवी यांनी आभार मानले.
डॉ. ए. बी. बलुगडे , डॉ. के. एम. देसाई , डॉ.डी एल काशीद पाटील, सौ.एन.डी.काशिद पाटील, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील ग्रंथसंपदेचे ग्रंथ प्रदर्शन संपन्न झाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारशील विचारांची, नैतिक मूल्यांची समाजाला गरज : प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण
|