राजकीय

सोलापूर–तुळजापूर–धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी १६४७.८७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर..

Solapur Tuljapur Dharashiv new broad gauge railway line


By nisha patil - 10/29/2025 11:23:27 AM
Share This News:



सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी एकूण ३ हजार २९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के हिस्स्याच्या स्वरूपात १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारकडून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीमुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहराला शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे विविध राज्यांतून तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय मोठ्या प्रमाणात होणार आहे.

राज्य सरकारने ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ५० टक्के आर्थिक सहभागाचे धोरण स्वीकारले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर–तुळजापूर–उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता.

या प्रकल्पासाठी १० फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य शासनाने एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ४५२.४६ कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास मान्यता दिली होती. मात्र, विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने रेल्वे प्रशासनाने ३ हजार २९५ कोटी ७४ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले.

या सुधारित अंदाजपत्रकानुसार राज्य शासनाचा हिस्सा १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपये एवढा ठरविण्यात आला असून, मंत्रिमंडळाने या रकमेच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखवला आहे. हा निधी टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारकडे उपलब्ध करून देण्यात येईल.

या निर्णयामुळे तुळजापूरसह धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे संपर्कात सुधारणा होऊन पर्यटन, वाहतूक आणि ग्रामीण विकासाला नवी गती मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


सोलापूर–तुळजापूर–धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी १६४७.८७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता
Total Views: 39