बातम्या
प्रभाग १४ मधील विहिरींवर सौर ऊर्जेवरील मोटर; बाळासाहेब ठाकरे लोककल्याण योजनेतून प्रत्येकी १.७५ लाखांचा निधी मंजूर
By nisha patil - 3/11/2026 11:34:57 PM
Share This News:
प्रभाग १४ मधील विहिरींवर सौर ऊर्जेवरील मोटर; बाळासाहेब ठाकरे लोककल्याण योजनेतून प्रत्येकी १.७५ लाखांचा निधी मंजूर
*आजरा (हसन तकीलदार)-: आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ मधील महिलांची पाण्यासाठीची गैरसोय दूर करण्यासाठी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या संकल्पनेतून गोठण गल्ली येथील विहीर आणि भगवा रक्षक तिठ्ठा येथील विहीर या दोन्ही विहिरींवर प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जेवर चालणारी मोटर बसवली जाणार आहे.
या कामासाठी 'हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी योजने'अंतर्गत प्रत्येक विहिरीकरिता १ लाख ७५ हजार रुपयांचा (₹१,७५,०००) निधी मंजूर झाला असून, हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी दिली.
या निर्णयामुळे महिलांना ७० ते ८० फूट खोल विहिरीतून रहाटाने पाणी शेंदण्याच्या शारीरिक कष्टापासून मोठी मुक्ती मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे नगरपंचायतीवर विजेच्या बिलाचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
विहीर परिसरात सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा योग्य निचरा करण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विहिरीजवळील परिसराचे सुशोभीकरण करून तेथील वातावरण स्वच्छ, सुंदर व चैतन्यपूर्ण ठेवण्यावर भर दिला जाईल.
याचबरोबर, या दोन्ही विहिरींच्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची आणि वाटसरूंची तहान भागवण्यासाठी छोट्या स्टेनलेस स्टीलच्या पिंपात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून ठेवली जाणार आहे. अभिषेक शिंपी यांच्या या दूरदृष्टीच्या आणि लोकोपयोगी निर्णयाचे प्रभागातील नागरिकांमधून, विशेषतः महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.
प्रभाग १४ मधील विहिरींवर सौर ऊर्जेवरील मोटर; बाळासाहेब ठाकरे लोककल्याण योजनेतून प्रत्येकी १.७५ लाखांचा निधी मंजूर
|