बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन
By nisha patil - 11/10/2025 5:18:40 PM
Share This News:
दिव्यांगांच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा – प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन
कोल्हापूर, दि. ११ : दिव्यांगांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असले तरी त्या योजनांचा खरा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष शिबिरात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या शिबिराचे आयोजन उच्च न्यायालय बालन्याय समिती, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कोल्हापूर महानगरपालिका, छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, सचिव दिपाली डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायाधीश अग्रवाल म्हणाल्या, “शिक्षण, प्रोत्साहन आणि योग्य संधीद्वारे दिव्यांगांना स्वावलंबी बनवले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द समाजासाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी दिव्यांग हक्क आणि संबंधित कायद्यांबाबतही मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. आयुक्त मंजुलक्ष्मी यांनी दिव्यांग भवन उभारण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमात विशेष प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. युडीआयडी कार्ड, पालकत्व प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती प्रमाणपत्र, श्रवणयंत्र आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. समाजकल्याण, जिल्हा परिषद, विद्यापीठ आणि महानगरपालिकेच्या १३ विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली डोईफोडे यांनी केले, सूत्रसंचालन अर्जना पानसरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष वामन यांनी केले. न्यायालयीन अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन
|