विशेष बातम्या
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
By nisha patil - 12/11/2025 4:26:01 PM
Share This News:
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
कोल्हापूर, दि. १२ नोव्हेंबर : कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवी यात्रेसाठी जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांना दिलासा मिळावा यासाठी एस.टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून रेणुका देवी भक्त मंडळे प्रासंगिक कराराद्वारे एस.टी. बससेवा वापरत आहेत. मागील १२ वर्षांच्या पाठपुराव्यामुळे एस.टी. महामंडळाने ४५ आसन क्षमतेपर्यंतच्या बसेससाठी प्रती किलोमीटर ₹५५ भाडे व प्रती तास ₹१० खोळंबा आकार आकारण्यास मंजुरी दिली होती. मात्र यंदा या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याने भक्तांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीवर तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना दिल्या आहेत.
आमदार क्षीरसागर यांनी निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर २०२५ मधील मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रा आणि फेब्रुवारी २०२६ मधील चैत्र यात्रा दरम्यान कोल्हापूर जिल्हा व परिसरातून मोठ्या संख्येने भाविक सौंदत्ती येथे जातात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सवलती लागू करून एस.टी. भाडे दर कमी करावेत व खोळंबा आकार रद्द करावा, अशी मागणी श्री रेणुका भक्त संघटनांनीही केली आहे.
दरम्यान, आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर विभागाच्या एस.टी. विभाग नियंत्रकांना या संदर्भात भाडे दर व खोळंबा आकार पुनरावलोकनाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, “लवकरच तोडगा निघून भाविकांना दिलासा मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.
सौंदत्ती यात्रेसाठी एस.टी. भाडे आणि खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
|