आरोग्य
जिल्ह्यात 9 ते 14 मार्च दरम्यान विशेष मोफत शस्त्रक्रिया अभियान
By nisha patil - 2/18/2026 6:26:41 PM
Share This News:
जिल्ह्यात 9 ते 14 मार्च दरम्यान विशेष मोफत शस्त्रक्रिया अभियान
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर व Rotary International यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी 9 ते 14 मार्च या कालावधीत विशेष मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज व हातकणंगले या तालुक्यांमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांची नावनोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. आजपासून नोंदणीस सुरुवात झाली असून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया ९ ते १४ मार्च या कालावधीत पार पडणार आहेत.
या शिबिरामध्ये स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, कान-नाक-घसा, मूत्ररोग, अस्थिरोग तसेच इतर सर्वसाधारण शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत केल्या जाणार आहेत.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, उपजिल्हा रुग्णालय गारगोटी तसेच ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रिया अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. दिलीप माने, उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांनी केले आहे.
जिल्ह्यात 9 ते 14 मार्च दरम्यान विशेष मोफत शस्त्रक्रिया अभियान
|