बातम्या
‘वेव्हज २०२५’मध्ये ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित
By nisha patil - 4/5/2025 12:39:30 AM
Share This News:
‘वेव्हज २०२५’मध्ये ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित
मुंबई – ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे सुरू असलेल्या या परिषदेत प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे सीईओ पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेषांकाचे संपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व ‘लोकराज्य’चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यात ‘लोकराज्य’चे प्रबंध संपादक हेमराज बागुल, प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक डॉ. गणेश मुळे आणि वर्षा आंधळे यांचीही उपस्थिती होती.
‘वेव्हज’ परिषदेसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण लेख, तसेच सागरी सुरक्षेवरील उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरता आणि जल व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे.
वेव्हज २०२५ परिषदेत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा सशक्त सहभाग असून, या विशेषांकाच्या माध्यमातून राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.
‘वेव्हज २०२५’मध्ये ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित
|