बातम्या
हुपरी–कोल्हापूर राज्यमार्गावर उचगांव येथे गतिरोधक बसवावेत; करवीर तालुका शिवसेनेची मागणी
By nisha patil - 12/23/2025 6:27:59 PM
Share This News:
हुपरी–कोल्हापूर राज्यमार्गावर उचगांव येथे गतिरोधक बसवावेत; करवीर तालुका शिवसेनेची मागणी
हुपरी–कोल्हापूर या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून हा मार्ग थेट कर्नाटकात जात असल्याने अवजड वाहनांची वर्दळ सातत्याने वाढत आहे. विशेषतः उचगांव परिसरात भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याने येथे तातडीने गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचे रमलर बसवावेत, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
उचगांवमधून कोल्हापूरकडे जाताना रस्ता ओलांडावा लागत असल्याने समोरून येणारी वाहने वेगात असल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. कालच उचगांव येथील रमेश राठोड हे कोल्हापूरकडे जात असताना भरधाव आरामबसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा भाग रहदारीचा असल्याने उचगांवच्या दोन्ही बाजूंना हुपरी–कोल्हापूर राज्यमार्गावर गतिरोधक किंवा रमलर करणे अत्यावश्यक आहे, असे शिवसेनेने स्पष्ट केले.
या संदर्भात करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. एस. बी. इंगवले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी अपघात टाळण्यासाठी रमलर, गतिरोधक तसेच वेगमर्यादेचे दिशादर्शक फलक बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, फेरीवाले संघटना तालुकाप्रमुख कैलास जाधव, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.
हुपरी–कोल्हापूर राज्यमार्गावर उचगांव येथे गतिरोधक बसवावेत; करवीर तालुका शिवसेनेची मागणी
|