बातम्या

माले येथे भरधाव दुचाकीची धडक; शेतकरी जागीच ठार

Speeding bike hits farmer in Male


By nisha patil - 11/29/2025 3:19:23 PM
Share This News:



माले येथे भरधाव दुचाकीची धडक; शेतकरी जागीच ठार

वाघबीळ–मसुदमाले (ता. पन्हाळा) रोडवर माले येथे दूध डेअरीत दूध घालण्यासाठी चालत जात असताना भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत शेतकरी भीमराव रघुनाथ चौगुले (वय ६५, रा. मसुदमाले, ता. पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, दि. २७ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

कोडोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव चौगुले हे नियमितप्रमाणे दूध घेऊन डेअरीकडे जात असताना बाघबीळकडून मालेकडे भरधाव वेगाने येत असलेल्या मोटरसायकलस्वार गौतम दगडू हिरवे (रा. माले) यांनी त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की चौगुले जवळपास वीस फूट रस्त्यावर फरफडत गेले. त्यामुळे त्यांच्या डोके, छाती आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली.

घटनास्थळावरून त्यांना तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी मोटरसायकलस्वार गौतम हिरवे यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौगुले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


माले येथे भरधाव दुचाकीची धडक; शेतकरी जागीच ठार
Total Views: 24