बातम्या
सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Administrator - 3/23/2026 4:26:39 PM
Share This News:
सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, ता. 23 : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सीएसआर निधीतून कामे करण्याच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आवाहनाला शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत अनेक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शहरातील मुख्य चौक, आयलंड, फुटपाथ, दुभाजक, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच महापालिकेच्या शाळा व उद्यानांच्या विकासावर सविस्तर चर्चा झाली. ‘कोल्हापूर फर्स्ट’ संस्थेकडून सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स व स्वच्छतागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी महापालिकेच्या धोरणाची माहिती देत इच्छुक संस्थांना संबंधित ठिकाणांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.
महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सामाजिक संस्थांच्या सहभागाचे कौतुक केले. आतापर्यंत 37 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 30 प्रस्तावांना अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, सर्व संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत विविध संस्थांनी पुढाकार जाहीर केले. ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे शहर विकासासाठी सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे शास्त्रीनगर येथील त्रिकोणी उद्यान विकसित करण्यात येणार आहे. पारस ओसवाल यांनी यल्लमामंदिर येथील संविधान चौक विकसित करण्याची घोषणा केली.
क्रिडाईतर्फे चार चौकांचे सुशोभीकरण तसेच धैर्यप्रसाद हॉल ते गोकुळ कार्यालय दरम्यान आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. फुलेवाडी येथील चौकाचे काम ओम कन्स्ट्रक्शनकडून करण्यात येणार आहे. तसेच एका फाउंडेशनच्या मदतीने चार शाळा उभारण्याचेही जाहीर करण्यात आले.
ब्लीम संस्थेकडून पंचगंगा घाट स्वच्छता, ‘नमामी पंचगंगा’ आरती कार्यक्रम, तसेच घाट परिसरात सुशोभीकरण व सीसीटीव्ही बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इनरव्हील संस्थेकडून एसटी स्टँड परिसरातील बाळासाहेब देसाई पुतळ्यासमोरील आयलंड विकसित करण्यात येणार आहे. वसुंधरा ग्रुपकडून शहरातील वृक्षलागवडीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
माजी नगरसेविका स्मिता माने यांनी मुक्त सैनिक गार्डन ते संभाजी महाराज पुतळा उद्यानापर्यंतच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्याची घोषणा केली.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, तसेच अनेक पदाधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केले.
सीएसआरमधून कोल्हापूर शहर सौंदर्यीकरणाला संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|