बातम्या
सावर्डे तर्फे असंडोली : नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 7/29/2025 9:21:57 PM
Share This News:
सावर्डे तर्फे असंडोली : नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामपंचायत सावर्डे व नॅब नेत्र रुग्णालय, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे तर्फे असंडोली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री ज्योतिलिंग मंदिरात पार पडलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
शिबिराची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नॅब रुग्णालयाचे फिल्ड ऑफिसर उदय मोरे, डॉ. प्रशांत मनोरकर आणि डॉ. निखिल पौराणिक उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतापसिंह काळे यांनी बोलताना सांगितले की, "समतेची जाणीव म्हणजेच आरोग्यसेवा ही सर्वांसाठी" हा शाहू महाराजांचा विचार नव नेत्र रुग्णालय व ग्रामपंचायत सावर्डे यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरतो आहे. डोळ्यांचे आरोग्य म्हणजे फक्त चांगले दिसणे नव्हे, तर स्वावलंबनाचा मार्ग आहे. ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत अशा सेवांचा पोहोच होणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात मोरेवाडी, मल्हारपेठ, सावर्डे तर्फे असंडोली येथील सुमारे १५० नागरिकांनी सहभाग नोंदवून नेत्र तपासणी करून घेतली. त्यातील काही रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून पुढील टप्प्यात त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात सरपंच संभाजी कापडे, उपसरपंच रणजित तांदळे, सरपंच शारदा पाटील, सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. निखिल पौराणिक (क्लिनिक इनचार्ज – नव नेत्र रुग्णालय) यांनी प्रमुख भूमिका बजावली.
या उपक्रमामुळे नेत्र आरोग्याबाबत जनजागृती झाली असून, अशा शिबिरांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सावर्डे तर्फे असंडोली : नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
|