ताज्या बातम्या
कोल्हापुरात राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 उत्साहात संपन्न
By nisha patil - 4/20/2026 4:37:55 PM
Share This News:
कोल्हापुरात ‘राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026’ उत्साहात संपन्न; कोल्हापुरात ‘राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर येथे सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026’ सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापिका सुनिता हनीमनाळे यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शिल्पा शशिकांत खोत यांची उपस्थिती विशेष ठरली. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक प्रतिष्ठा लाभली.
तसेच कार्यक्रमात मा. श्री. बाळ ठेकेकर, मा. श्री. के. डी. पाटील (सर), मा. श्री. एकनाथ कुमार (सर) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. याशिवाय मा. शिवाजीराव भोसले, मा. प्रसाद संकपाळ, मा. बाबासाहेब वाघमोडे, मा. विजयश्री भोसले, मा. सागर पाटील, मा. अजित ठोंगे, मा. मेघा सागर पाटील, मा. राजेंद्र तांबणकर, मा. सौ. युगंधरा कोळी, मा. सौ. भारती गायकवाड आदी मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, उद्योग क्षेत्रातील प्रगती आणि समाजोपयोगी कार्य या विषयांवर विशेष भर देण्यात आला. संस्थेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणारे स्वावलंबन उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य सेवा आणि कोरोना काळातील मदतकार्य याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना सन्मानित मान्यवरांनी हा गौरव त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संस्थापिका सुनिता हनीमनाळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देणे आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.” मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला आणि कोल्हापूरच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात प्रेरणादायी संदेश देऊन गेला.
सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026’ या भव्य सोहळ्याचे संपूर्ण आणि प्रभावी कव्हरेज ‘तारा न्यूज’ने साकारत या कार्यक्रमाला अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.


कोल्हापुरात राज्यस्तरीय उद्योग गौरव पुरस्कार 2026 उत्साहात संपन्न
|