बातम्या

शाळांच्या संचमान्यतेवरून राज्यभर आंदोलनाची घोषणा; ५ डिसेंबरला शाळा बंद

State wide protest announced over school group recognition


By nisha patil - 1/12/2025 3:54:59 PM
Share This News:



शाळांच्या संचमान्यतेवरून राज्यभर आंदोलनाची घोषणा; ५ डिसेंबरला शाळा बंद

राज्यातील शाळांच्या संचमान्यतेसंदर्भात १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे सरकारी व अनुदानित शाळांवर बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ५ डिसेंबरपर्यंतची संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे कमी पटसंख्येच्या सुमारे १८ हजार शाळा बंद पडण्याचा धोका असून २० ते २५ हजार शिक्षक व मुख्याध्यापकांची पदे अतिरिक्त ठरणार आहेत. अनेक शाळांत फक्त एक-दोनच शिक्षक उरणार, तर हजारो शाळांमध्ये पाचवीचा वर्ग शिक्षकाविना चालण्याची वेळ येईल, असा आरोप संघटनांनी केला.

राज्यातील १२ पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी ५ डिसेंबरला शाळा बंद ठेवण्याची चेतावणी दिली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आणि शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शाळांनी सरकारच्या धोरणाविरोधात एकजुटीने निषेध नोंदवावा, असे आवाहन केले.

सरकारी धोरण हे शाळा बंद करण्याकडे नेणारे असून निवृत्तीच्या उंबरठ्यावरच्या शिक्षकांवर अनावश्यक टीईटी लादणे, वाढत्या अशैक्षणिक कामाच्या ओझ्याबाबत कोणतीही सुधारणा न करणे, यावरही संघटनांचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे ५ डिसेंबरला राज्यभर शाळा बंद आंदोलन होणार आहे.


शाळांच्या संचमान्यतेवरून राज्यभर आंदोलनाची घोषणा; ५ डिसेंबरला शाळा बंद
Total Views: 26