बातम्या

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन; "महापालिका उमेदवारीत खरे हिंदुत्वनिष्ठांना प्राधान्य द्या" स्पष्ट मागणी

Statement by Hindutva organizations in Kolhapur


By nisha patil - 11/22/2025 6:05:01 PM
Share This News:



कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन; "महापालिका उमेदवारीत खरे हिंदुत्वनिष्ठांना प्राधान्य द्या" स्पष्ट मागणी

कोल्हापूर,: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी उमेदवार निवडीसाठी स्पष्ट हिंदुत्वनिष्ठ निकष लागू करण्याची ठोस मागणी केली आहे. शिवस्वराज्य मंच, हिंदू एकता आंदोलन, शिवप्रतिष्ठान, हिंदू महासभा आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्त निवेदन कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना नेते नाना कदम आणि शिवसेना आध्यात्मिक आघाडी प्रमुख अक्षय भोसले महाराज यांना सादर केले.

निवेदनात, कोल्हापूरातील सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत इस्लामिक कट्टरतेविरोधात केलेल्या आंदोलनांची, सामाजिक संघर्षातील सहभागाची आणि निःस्वार्थी कार्याची नोंद करून या कार्यकर्त्यांच्या न्याय्य सन्मानाची मागणी करण्यात आली.

संघटनांनी उमेदवार निवड प्रक्रियेसाठी तीन मुख्य मुद्दे मांडले आहेत :

1. हिंदुत्व रक्षणाची लेखी शपथ:
उमेदवारी इच्छुकांनी धर्मांतरविरोध, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, वोट जिहाद अशा विषयांवर स्पष्ट, ठाम आणि लेखी भूमिका देणे बंधनकारक करावे.


2. प्रत्यक्ष कृतींची पडताळणी:
हिंदुत्व विषयांवरील आंदोलन, बेकायदेशीर भोंगे हटवण्याचे प्रयत्न, धर्मांतरणविरोधी तक्रारी, प्रशासन व पोलिसांकडे दिलेल्या अर्जांचा प्रत्यक्ष इतिहास तपासावा.


3. खऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य:
पैसा, पद किंवा घराणेशाही नसूनही रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारीत योग्य न्याय द्यावा.

 

संघटनांनी स्पष्ट म्हटले आहे की, “ज्यांना हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, अशा व्यक्तींना उमेदवारी देऊ नका”, आणि हा संदेश पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवावा अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.

या भेटीनंतर शिवस्वराज्य मंचाचे समन्वयक दिपक देसाई यांनी सांगितले की,“आजपासून आमच्या भेटीगाठींच्या मोहीमेची सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत कोल्हापूर शहरातील इतर हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही भेटून हीच मागणी मांडण्यात येणार आहे.”

हे निवेदन देताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष  दिपक देसाई, शिवप्रतिष्ठानचे आशिष लोखंडे, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, गजानन तोडकर, विलास मोहिते,हिंदूराव शेळके, विक्रम जरग, विशाल पाटील, अवधूत भाटे, अंजली जाधव, पुजा कणसे,वंदना बोंबलवाड, धनश्री तोडकर,अमय भालकर, बाबु साखळकर, सुनील वाडकर,अतुल चव्हाण, विशाल रॉय, विकास जाधव ,आषिश पाटील, निरंजन शिंदे,सुनिल शिंदे ,योगेश केळकर ,सागर वडर, राजेंद्र मेहता,राजु गडकरी तसेच शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनांनी निवेदनाचा उद्देश संघर्ष नसून सकारात्मक संवादातून न्याय आणि प्रतिनिधित्व मिळवणे असा असल्याचे स्पष्ट केले.


कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन; "महापालिका उमेदवारीत खरे हिंदुत्वनिष्ठांना प्राधान्य द्या" स्पष्ट मागणी
Total Views: 40