विशेष बातम्या

खासदार धनंजय महाडिक यांचे विधान : अपायकारक उत्पादनांवरील अतिरिक्त उपकरातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

Statement by MP Dhananjay Mahadik


By nisha patil - 10/12/2025 3:41:35 PM
Share This News:



खासदार धनंजय महाडिक यांचे विधान : अपायकारक उत्पादनांवरील अतिरिक्त उपकरातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

नवी दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी स्वास्थ्य सुरक्षा राष्ट्रीय उपकर विधेयक २०२५ याला जोरदार समर्थन देत सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत केले. गुटखा, तंबाखू, पान मसाला यांसारख्या आरोग्याला अपायकारक उत्पादनांवर अतिरिक्त उपकर लावून मिळणारा निधी नागरिकांच्या मोफत आरोग्य सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

महाडिक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेले हे विधेयक देशातील कोट्यवधी गरीबांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल. मागील आठवड्यात तंबाखूवरील उपकर आणि या आठवड्यात गुटखा-पान मसाल्यावर प्रस्तावित उपकरामुळे आरोग्य क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीन विधेयकानुसार ‘आयुष्यमान भारत’ योजनेतील विमा मर्यादा ५ लाखांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कॅन्सर, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण यांसारखे गंभीर आजारही गरीब नागरिकांसाठी मोफत उपचारक्षम होतील. प्रत्येक गावात डिजिटल आभा हेल्थ कार्ड अनिवार्य केल्याने ग्रामीण नागरिकांना महानगरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हिडिओद्वारे उपचार घेणे सुलभ होणार आहे.

कोरोना महामारीच्या अनुभवाचा उल्लेख करताना महाडिक यांनी एआय-आधारित डिजिटल मॉनिटरिंगमुळे भविष्यातील कोणतीही महामारी १५–२० दिवस आधी ओळखता येऊ शकते, असेही सांगितले. “आरोग्य सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी विरोधकांच्या शंकांचे निरसन करत सांगितले की, उपकर हा उत्पादनावर नसून पॅकेजिंग आणि क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. उपकरातून जमा होणारा निधी संपूर्णपणे आरोग्य संरक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्राला ६.८१ लाख कोटींची तरतूद असताना, आरोग्य क्षेत्रालाही विक्रमी निधी मिळण्याची तयारी सरकारने दर्शवली असून “जवानाचे शस्त्र जितके आवश्यक, तितकाच गरीब आईचा उपचार आवश्यक” असे पंतप्रधान मोदींचे विचारही त्यांनी अधोरेखित केले.

भारतनेटमुळे इंटरनेट देशाच्या प्रत्येक गावात पोहोचल्याने टेलिमेडिसिन आणि डिजिटल हेल्थ सेवा सर्वत्र पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०३० पर्यंत प्रत्येक नागरिकाचे स्वतंत्र हेल्थ प्रोफाइल तयार करण्याचा सरकारचा संकल्प त्यांनी मांडला.

महाडिक यांनी सर्व पक्षांना हे विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन करत—२०२५ हे वर्ष ‘स्वास्थ्य अमृत महोत्सव’ ठरावे, अशी भावना व्यक्त केली.

 

खासदार धनंजय महाडिक यांचे विधान : अपायकारक उत्पादनांवरील अतिरिक्त उपकरातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा
Total Views: 16