बातम्या
महाराष्ट्रात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; दररोज ३,५०० नागरिक डॉग बाईटचे बळी
By Administrator - 9/13/2025 12:02:31 PM
Share This News:
महाराष्ट्रात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांवर, बाजारपेठेत, शाळांच्या परिसरात कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहेत. अचानक कुत्री धावून आल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टोळक्याने हल्ला करणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांना बाहेर फिरणे जिकिरीचे झाले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ३५ ते ४० लाख मोकाट कुत्री आहेत. दररोज साडेतीन हजार नागरिकांना कुत्र्यांचे चावे लागत असून, दरवर्षी १० ते १२ लाख लोकांना उपचार घ्यावे लागतात. मागील तीन वर्षांत तब्बल ३० लाख नागरिक हल्ल्यांचे बळी ठरले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातच रोज सरासरी ५० ते ६० नागरिक कुत्र्यांच्या चावण्यामुळे शासकीय दवाखान्यात उपचार घेतात. यात लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचा मोठा वाटा असून, त्यांच्यावर हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे.
चिंताजनक आकडेवारी
• राज्यातील मोकाट कुत्री : अंदाजे ३५ ते ४० लाख
• दररोज कुत्र्यांचे चावे : सरासरी ३,५०० प्रकरणे
• दरवर्षी उपचार घेणारे : १० ते १२ लाख नागरिक
• तीन वर्षांत हल्ल्यांचे बळी : तब्बल ३० लाख नागरिक
कुत्रे चावल्यास काय कराल?
• जखम त्वरित साबणाने धुवून स्वच्छ करा
• लगेच दवाखान्यात जाऊन रेबिज लस घ्या
• मुलं व वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
तज्ज्ञांच्या मते, मोकाट कुत्र्यांचे निर्बंध घालण्यासाठी नियमावली कडक करणे, पाळीव प्राण्यांना परवाना बंधनकारक करणे आणि घरगुती कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. अन्यथा, हा प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो.
महाराष्ट्रात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; दररोज ३,५०० नागरिक डॉग बाईटचे बळी
|