शैक्षणिक

कोरगांवकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केले शालेय कामकाज

Students did school work at Korgaonkar High School


By nisha patil - 5/9/2025 5:53:23 PM
Share This News:



कोरगांवकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केले शालेय कामकाज

कोल्हापूर  :    गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा या काव्यपंक्तीनुसार आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने शालेय कामकाजाची अनुभूती घेण्याबरोबरच अध्यापनाचा आनंद घेतला . ओंकार कांबळे याने विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून तर आयेशा शेख हिने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . इयत्ता पाचवी ते दहावी वर्गांसाठी तब्बल ऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक होवून ज्ञानार्जन केले . शिक्षक होवून अध्यापन करणे किती अवघड असते याची आज प्रचिती आली असे प्रतिपादन विद्यार्थी पर्यवेक्षिका आयेशा शेख हिने केले तर शालेय प्रशासन निभावताना नियमित मुख्याध्यापकांना किती कसरत करावी लागते हे खऱ्या अर्थाने त्या भूमिकेत शिरल्यानंतरच लक्षात आले असे मत विद्यार्थी मुख्याध्यापक ओंकार कांबळे याने व्यक्त केले .
       

पाठाची परिपूर्ण तयारी आणि नियमित शिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्याने हा उपक्रम खूपच यशस्वी झाल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी व्यक्त केले तसेच भविष्यात या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हावेसे वाटणे यातच शाळेचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी नमूद केले . 
 

प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते झाले पर्यवेक्षिका सुरेखा पोवार,सदाशिव -हाटवळ, सुनील साजणे,प्रमोद कुलकर्णी यांनी उपक्रमाचे संयोजन केले . विद्यार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी सलीम मणियार, तृप्ती रावराणे, हेमलता पाटील, राजाराम संकपाळ, उज्वला बुणांद्रे,श्रीमती महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका व अधिव्याख्याते डॉक्टर तारासिंग नाईक उपस्थित होते .


कोरगांवकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केले शालेय कामकाज
Total Views: 301