बातम्या
पारंपारिक वेशात, विद्यार्थी जोशात कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरभारतीचे दर्शन
By nisha patil - 9/23/2025 3:50:39 PM
Share This News:
पारंपारिक वेशात, विद्यार्थी जोशात कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरभारतीचे दर्शन
कोल्हापूर : सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये आज शाही दसरा महोत्सव उत्साहाने साजरा झाला . यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक वेषात आले होते .
वर्गनिहाय 'विविध राज्यातील पोशाखांमध्ये विद्यार्थी - विद्यार्थीनी शाळेत आल्यानंतर सानेगुरुजींच्या आंतरभारतीची संकल्पना खऱ्या अर्थाने पार पडल्याची प्रचिती आली . विद्यार्थिनींच्या पेहरावामध्ये महाराष्ट्राचा कासोटा, राजस्थानी घागरा, गुजराती साडी, तामिळनाडू लेहंगा, कर्नाटकी चोली चनिया आदी वस्त्रप्रकारांचा समावेश होता . विद्यार्थीनींनी पोशाखास साजेसा साजश्रुंगार केला होता . वर्गामध्ये आनंददायी वातावरण होते . विद्यार्थ्यांनी डोक्यावर फेटा, गांधी टोपी, कोल्हापूरी चप्पल, विजार, सलवार कमीज, कोट, जाकीट असा पेहराव करून भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन घडवले . शिक्षकांमध्येही याबाबत कमालीचा उत्साह जाणवला . नवरात्रातील रंग लक्षात ठेवून महिला शिक्षिका लाल रंगाच्या साडीमध्ये आल्या होत्या .
तर शिक्षक सलवार कमीज, फेटा, जाकीट, टोपी अशा पोशाखात शाळेत आले होते . माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार पारंपारिक पोशाखाचा हा सोहळा कोरगांवकर हायस्कूलमध्ये विशेष लक्षवेधी ठरला . अनेक विद्यार्थ्यांनी सेल्फी विथ क्लासटीचर या उपक्रमात सहभागी होवून आनंद द्विगुणीत केला . मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सुरेखा पोवार, सुनील साजणे, सुरगोंडा पाटील, मीना बुचडे, बाबासाहेब डोणे, सुभाष बेलवळेकर यांनी संयोजन केले .
पारंपारिक वेशात, विद्यार्थी जोशात कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरभारतीचे दर्शन
|