बातम्या
विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रात करीअर करावे - रेडीओ आर.जे. मनीष आपटे
By nisha patil - 12/20/2025 4:06:01 PM
Share This News:
विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रात करीअर करावे - रेडीओ आर.जे. मनीष आपटे
कोल्हापूर 20: विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रात करीअर करणेसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ए.एम.एफ.एम. चॅनेल, ऑल इंडिया रेडीओ, जाहिरात एजन्सी अशा विविध क्षेत्रात नोकऱ्या आपली वाट पाहत आहेत. उत्तम रेडीओ जॉकी होणेसाठी विविध विषयांचा व्यासंग, चौफेर वाचन, भाषा व साहित्य, सांस्कृतिक या गोष्टींची जाण असणे आवश्यक आहे. स्वरुपानुसार उत्तम संहिता लेखन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना छान लिहीता वाचता येते त्यांना आर.जे. होण्याची उत्तम संधी आहे, असे मत सुप्रसिध्द रेडीओ जॉकी (आर.जे.) मनीष आपटे यांनी मांडले.
येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या ज्युनियर आर्टस विभागाच्यावतीने नोकरी व करीअरच्या संधी या उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय हॉल येथे केले होते. स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.सौ.शिल्पा भोसले यांनी केले. याप्रसंगी त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नानाविध कला गुणांना वाव देण्यासाठी व भविष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करणेसाठी विविध मान्यवरांचे त्या-त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्याने विवेकांनद कॉलेज आयोजित करीत असते. विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रातील करीअरच्या संधीचा फायदा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मनीष आपटे पुढे म्हणाले, रेडीओमध्ये स्क्रीप्ट रायटर, सेल्स विभाग, जाहिरात लेखन, अनुवाद, विविध आवाज देणारे तंत्रज्ञ, कौशल्य पूर्ण कर्मचारी यांची आवश्यकता असते. सर्व क्षेत्रांची माहिती असलेला विद्यार्थी उत्तम आर.जे. म्हणून करीअर करु शकतो. रेडीओ मध्ये करमणूकीबरोबर, लोकरंजन आणि लोकप्रबोधन याला प्राधान्य दिले जाते. जीवनाच्या चौफेर विषयांचे ज्ञान व माहिती यांचे प्रसारण केले जाते. शेती, शिक्षण, आरोग्य, बातम्या, हवामान, स्थानिक माहिती इत्यादी सोप्या पध्दतीने सांगून श्रोत्यांचे मनोरंजन करण्याची कला ही रेडीओ जॉकीकडे असणे गरजेचे असते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थना गायनाने झाली. प्रा.नयना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सौ.एस.एन.ढगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी रेडीओ क्षेत्रात करीअर करावे - रेडीओ आर.जे. मनीष आपटे
|