शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी चौकसपणे विचार करावा – विश्वजीत भोसले
By nisha patil - 2/12/2025 11:00:04 AM
Share This News:
कोल्हापूर : स्पर्धात्मक युग, बदललेली शैक्षणिक अध्यापन पद्धती व गतिमान जीवन यामुळे शिक्षणाची पारंपारिक चौकट मोडीत निघाली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी करियर व आयुष्यातील विविध प्रश्नांप्रती विविधांगी व चौकसपणे विचार करण्याची सवय निर्माण करावी. यामुळे येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या आवाहनांनाही सक्षमपणे सामोरे जाता येईल, असे मत महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी व्यक्त केले. विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरमधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणी दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विश्वजीत भोसले पुढे म्हणाले, ‘मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे सामाजिक व राजकीय संदर्भ लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी आपल्या जाणीवा समृद्ध कराव्यात. नवीन तांत्रिक कौशल्ये आत्मसात करत आपले वेगळेपण जपावे. आपापल्या क्षेत्रातील उच्च पदवी संपादित करावी. समाजाचा आरसा असणाऱ्या वृत्तपत्रांचे नियमित वाचन करावे.’ अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.बी.थोरात म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांमध्ये शैक्षणिक पात्रता पूर्ण करताना त्या विषयांमध्ये पारंगत होऊन अग्रक्रमाने पुढे राहावे. ज्यामुळे पदवीनंतर समाजामध्ये वावरताना येणाऱ्या असंख्य आवाहनांना सक्षमपणे सामोरे जाण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.’
सदर कार्यक्रमासाठी एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्जंट नेहा मेहरवाडे तर आभार सार्जंट सायली वाडकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आयक्यूएससी प्रमुख डॉ.श्रुती जोशी, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलवडे, मेजर सुनिता भोसले, रजिस्टर एस.के. धनवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी चौकसपणे विचार करावा – विश्वजीत भोसले
|