बातम्या
आंदोलन अंकुशच्या पाठपुराव्याला यश; आचिन हेरवाडे यांच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे
By nisha patil - 10/13/2026 11:05:53 PM
Share This News:
दत्तवाडची रखडलेली पाणीपुरवठा योजना मार्गी; १० नोव्हेंबरपूर्वी योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन!
आंदोलन अंकुशच्या पाठपुराव्याला यश; आचिन हेरवाडे यांच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे
दत्तवाड प्रतिनिधी : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना गेल्या १३ ते १४ वर्षांपासून रखडली होती. राजकीय हस्तक्षेप, कंत्राटदारांची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या योजनेचे काम रखडल्याची चर्चा होती. त्यामुळे योजना प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये अनिश्चितता होती. मात्र, आंदोलन अंकुशच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता ही योजना कार्यान्वित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
या योजनेसाठी पाण्याची टाकी आणि जॅकवेल उभारण्यासाठी दत्तवाडचे माजी जिल्हा परिषद सदस्य कै. बंडा आप्पा माने आणि माजी सरपंच आणासो सिदनाळे यांनी गावाच्या हितासाठी जागा मोफत देणगी स्वरूपात दिली होती. जागेची उपलब्धता असूनही विविध कारणांमुळे योजना अनेक वर्षे रखडली होती.
आंदोलन अंकुशचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
दत्तवाडमधील आंदोलन अंकुशचे आचिन हेरवाडे (पत्रकार)यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी निवेदने देऊन संबंधित शासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, भूषण गंगावणे, दीपक पाटील आणि राकेश जगदाळे यांचे सहकार्य लाभले.
१० नोव्हेंबरपूर्वी योजना सुरू करण्याचे आश्वासन दरम्यान, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. लोहार यांनी प्रत्यक्ष योजनेच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी १० नोव्हेंबरपूर्वी ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या योजनेला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे श्री. कडोले, दत्तवाड ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. विनायक कोळी, पंचायत समितीचे अधिकारी श्री. संतोष चव्हाण, बांधकाम विभागाचे अशोक पाटील आणि आंदोलन अंकुशचे आचिन हेरवाडे (पत्रकार)यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केली.
१३ ते १४ वर्षांपासून रखडलेल्या या योजनेचे काम आता निर्धारित मुदतीत पूर्ण होऊन दत्तवाडकरांना नियमित पाणीपुरवठा सुरू होणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
आंदोलन अंकुशच्या पाठपुराव्याला यश; आचिन हेरवाडे यांच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे
|