बातम्या
सुधार गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या; निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 5/15/2026 9:10:54 PM
Share This News:
सुधार गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या; निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, दि. १५ : करवीर तालुक्यातील सुधार गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या ३४३ कोटी रुपयांच्या या योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी बैठकीत योजनेचे सुमारे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. उर्वरित कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा देत आमदार क्षीरसागर यांनी नागरिकांच्या पाणी प्रश्नाशी तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
योजनेअंतर्गत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रस्ते खुदाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देत, खोदलेले सर्व रस्ते पुढील एका महिन्याच्या आत पूर्ववत करण्याचे आदेशही आमदार क्षीरसागर यांनी संबंधित ठेकेदारांना दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील, उपअभियंता पी. एच. गायकवाड तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
सुधार गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्या; निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आमदार राजेश क्षीरसागर
|