विशेष बातम्या
साखर कारखान्यांकडील २ हजार कोटींची एफ.आर.पी. थकबाकी; तातडीने आर.आर.सी. कारवाई करा — राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी
By nisha patil - 10/12/2025 4:01:08 PM
Share This News:
साखर कारखान्यांकडील २ हजार कोटींची एफ.आर.पी. थकबाकी; तातडीने आर.आर.सी. कारवाई करा — राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी
जयसिंगपूर (प्रतिनिधी) राज्यातील १६३ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन सुमारे ४० दिवस लोटले असतानाही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम अदा केलेली नाही. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान गाळप केलेल्या ऊसासाठी जवळपास २ हजार कोटी रुपयांची उसबिले थकलेली असल्यामुळे तत्काळ आर.आर.सी. अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
राज्यात या हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत १ कोटी १० लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे. त्यापैकी फक्त ३४ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफ.आर.पी. अदा केली असून १२९ कारखान्यांकडे तब्बल २००५ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीवर १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एकरकमी एफ.आर.पी. देण्याच्या आदेशाविरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. शेतकऱ्यांना तीन टप्यात एफ.आर.पी. देण्याची राज्य सरकारची मागणी असून, या याचिकेची पुढील सुनावणी १७ डिसेंबरला होणार आहे. ९ नोव्हेंबरच्या सुनावणीत सरकार, साखर संघ आणि कारखानदारांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मागितली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती नाकारत तातडीची सुनावणी निश्चित केली.
राजू शेट्टींनी आरोप केला की, राज्य सरकार कारखानदारांच्या बाजूने उभे राहत असल्याने अनेक कारखाने एफ.आर.पी. देण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात थकीत एफ.आर.पी. मोठ्या प्रमाणात असून, स्वाभिमानीच्या दबावामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफ.आर.पी. अदा केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी थकीत रकमेची तातडीने वसुली करावी, अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
साखर कारखान्यांकडील २ हजार कोटींची एफ.आर.पी. थकबाकी; तातडीने आर.आर.सी. कारवाई करा — राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी
|