बातम्या
ऊस दराचा तोडगा होईपर्यंत ऊस तोड बंद.....
By nisha patil - 9/29/2026 3:23:33 PM
Share This News:
ऊस दराचा तोडगा होईपर्यंत ऊस तोड बंद.....
धनाजी चुडमुंगे; अर्जुनवाडमध्ये ‘आंदोलन अंकुश’ची जागर सभा.............
शिरोळ विभाग प्रतिनिधी : आचिन हेरवाडे....... अर्जुनवाड : गत हंगामातील साखर कारखान्यांच्या नफ्यातील शेतकऱ्यांचा वाटा म्हणून प्रतिटन ३०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, तसेच पुढील वर्षभर साखरेचे दर किमान ५० रुपये प्रतिकिलो राहण्याची शक्यता लक्षात घेता यंदाच्या उसाला किमान ५ हजार रुपये प्रतिटन पहिली उचल मिळाली पाहिजे. या मागणीबाबत सकारात्मक तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडणी घेऊ नये, असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले.
अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील शिवाजी चौकात ऊस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित पहिल्या जागर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव देसाई होते.
चुडमुंगे म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती, दुष्काळाचे सावट आणि ऊसाची संभाव्य टंचाई यामुळे पुढील वर्षभर साखरेला चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या उसालाही उच्चांकी दर मिळवून घेण्याची संधी शेतकऱ्यांसमोर आहे. अद्याप उसाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये. दराचा तोडगा निघेपर्यंत शेताच्या बांधावर थांबण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीही शेतकऱ्यांनी ऊस तोडणीला विरोध करून कारखान्यांनी जाहीर केलेला दर अमान्य केला होता. त्यामुळे कारखान्यांची कोंडी झाली आणि ‘आंदोलन अंकुश’च्या बांधावरच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. त्याचा परिणाम म्हणून एफआरपीवर प्रतिटन २५० रुपये अतिरिक्त दर देण्याची वेळ कारखानदारांवर आली, असा दावा चुडमुंगे यांनी केला.
यंदाही उसाचा संभाव्य तुटवडा, तसेच साखर, बगॅस आणि मळीला मिळणारे चांगले बाजारभाव यामुळे कारखाने नफ्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा योग्य वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. संघटनेच्या निर्णयापर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडणी घेऊ नये आणि दराचा योग्य तोडगा निघाल्याशिवाय घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची मोठी किंमत कारखानदारांना मोजावी लागेल,
असा इशाराही चुडमुंगे यांनी दिला.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जितेंद्र चोगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कृष्णा देशमुख, राकेश जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संजय चौगुले, उद्धव मगदूम, किरण वाणी, चंद्रकांत पाटील, आनंदा परीट, सुरेश झांबरे, पोपट परीट, अनिल मेडसिंगे, अरुण धनवडे, दिलीप ढवळे, पोपट संकपाळ, महादेव काळे, संभाजी शिंदे, बंटी माळी, भूषण गंगावणे, भारत ढाले, राजू आवळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊस दराचा तोडगा होईपर्यंत ऊस तोड बंद.....
|