बातम्या

सोलापूरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटला; आजपासून 'काटा बंद' आंदोलन!

Sugarcane price struggle erupts in Solapur


By nisha patil - 11/19/2026 8:36:58 PM
Share This News:



सोलापूरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटला; आजपासून 'काटा बंद' आंदोलन!

 सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून काटा बंद आंदोलन सुरू झाले आहे. ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या शेतकरी बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. ऊस दराच्या प्रश्नावर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक १९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

या बैठकीत राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या रिकव्हरीची आकडेवारी मांडली. जिल्ह्यातील ३९ कारखान्यांपैकी १४ हून अधिक कारखान्यांची साखर रिकव्हरी ११ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर ११ कारखान्यांची रिकव्हरी ९.७५ ते १०.७५ टक्क्यांदरम्यान आहे. या आकडेवारीच्या आधारे कारखानदार शेतकऱ्यांना पहिली उचल ३५०० रुपये देऊ शकतात, असा दावा राजू शेट्टी यांनी केला.

मात्र, कारखानदारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात असल्याचा आरोप करत आजपासून काटा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

२४ नोव्हेंबरच्या महामार्ग रोको आंदोलनात लाखोंच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे आता ऊस दराचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.


सोलापूरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटला; आजपासून 'काटा बंद' आंदोलन!
Total Views: 14