बातम्या
फलटण डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात सुसाईड नोट ठरली तपासाचा केंद्रबिंदू!
By nisha patil - 10/28/2025 12:15:22 PM
Share This News:
फलटण:- फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलंबित पीएसआय गोपाळ बदने याला सह दिवाणी न्यायाधीश ए.एस. साटोटे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली असली तरी, न्यायालयाने बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सरकारी वकील सुचिता वायकर-बाबर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “हा गुन्हा अत्यंत गंभीर असून महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणारा आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी आणि सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या बलात्काराच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी कोठडी आवश्यक आहे.”
दुसरीकडे, आरोपी बदनेच्या वतीने अॅड. राहुल धायगुडे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, “गोपाळ बदने निर्दोष आहे. एफआयआरमधील नोंदी विरोधाभासी असून, त्याला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा उल्लेख दुसऱ्या आरोपीच्या संदर्भात आहे.”
सरकारी वकिलांनी प्रत्युत्तरात म्हटले की, “सुसाईड नोट ही मृत्यूपूर्वीचा खुलासा (डाईंग डिक्लेरेशन) मानली जाते. मरणारी व्यक्ती खोटं बोलत नाही, हे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे.”
या सर्व युक्तिवादानंतर न्यायालयाने निलंबित पीएसआय गोपाळ बदनेला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपासादरम्यान या प्रकरणात नवे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फलटण डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात सुसाईड नोट ठरली तपासाचा केंद्रबिंदू!
|